चेन्नई, दि. 19 - मागच्या काही महीन्यांपासून अण्णाद्रमुकमध्ये सुरु असलेला संघर्ष संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. ओ. पनीरसेल्वम यांचा गट विद्यमान मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्याबरोबर तडजोड करायला तयार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या सोमवारी अण्णाद्रमुकमधील हे दोन्ही गट एकत्र येण्याची घोषणा करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून या दोन्ही गटांवर एकत्र येण्यासाठी मोठा दबाव होता.
अण्णाद्रमुकमधील दोन्ही गट आणि भाजपामधील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार येत्या सोमवारी हे दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा होऊ शकते. अमित शहा यांच्या तामिळनाडू दौ-याच्या एकदिवस आधी ही घोषणा होईल. काल दोन्ही गटातील नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. शुक्रवारीच हे दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा होईल असे चित्र निर्माण झाले होते. मरीना बीचवरील जयललिता यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटाचे नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने जमले होते. पण उशिरापर्यंत कुठलीही माहिती मिळत नसल्याने अखेर जमलेले कार्यकर्ते माघारी फिरले.
येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल. पक्ष कार्यकर्त्यांचे हित डोळयासमोर ठेऊन निर्णय घेऊ असे पनीरसेल्वम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्ही.के.शशिकलाच्या कुटुंबाची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी आणि जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाचा सीबीआय तपास या पनीरसेल्वम गटाच्या दोन मुख्य मागण्या आहेत तसेच मुख्यमंत्री किंवा पक्षाचे सरचिटणीसपदी द्यावे ही पनीरसेल्वम गटाची तिसरी मागणी आहे. पलानीस्वामी गटाकडून या तिन्ही मागण्यांवर कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने एकत्रीकरणाची घोषणा रखडली आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात शशिकला व ओ पन्नीरसेल्वम असे दोन गट पडले. त्यांनी अण्णाद्रमुकमधील आमदारांच्या मदतीने पक्षाचे सरचिटणीसपद मिळवले व मुख्यमंत्रीपदाची मोर्चेबांधणी केली होती. पण या दरम्यान त्यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे शशिकला यांना तुरुंगातून पलानीस्वामी यांचा शपथविधी पाहावा लागला.
शशिकला तुरुंगात गेल्यानंतर पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी गट यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. पनीरसेल्वम गटाने शशिकला आणि तिच्या कुटुंबाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची अट टाकली. टीटीव्ही दिनकरन व त्यांच्या कुटुंबीयांना अण्णाद्रमुकपासून दूर ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे दोन गटांतील ऐक्याची प्रक्रिया सोपी झाली.