लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पालघर येथे २०२० साली तीन साधूंची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली होती. या हत्याकांडाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी आम्ही याआधीच तयारी दर्शविली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली.
सीबीआय चौकशीची तयारी दर्शविल्याने या मुद्द्यासंदर्भातील चार प्रलंबित याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्या. पालघर हत्याकांडासंदर्भात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या नव्या प्रतिज्ञापत्राची सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या. पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने दखल घेतली. सीबीआय चौकशीस महाराष्ट्र सरकार तयार असल्याने अशा चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांचे औचित्य उरत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.