नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालामध्ये सांगितले आहे की, आयकर भरताना आधार- पॅन कार्ड जोडावे लागणार आहे. न्यायमूर्ती ए. के. सीक्री आणि ए. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने यापूर्वीच याबाबतचा निर्णय दिला असून आयकर कायदा 139 एए ला कायम ठेवले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या एका याचिकेसंबंधीत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये श्रेया सेन आणि जयश्री सातपुते यांना पॅन-आधार लिंक केलेले नसले तरीही 2018-19 साठी आयकर भरण्यास परवानगी दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाने यावर मत मांडताना म्हटले की, उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रक्रिया सुरु असल्याचे विचारात घेऊन दिला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. यामुळे आधार आणि पॅन कार्ड जोडणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळे 2019-20 साठी आयकर भरताना पॅन आधार जोडणी करावी लागणार आहे. अन्यथा भरलेला आयटीआर गृहीत धरला जाणार नाही.