ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) बायोटेक्नोलॉजी कंपनी पॅनेशिया बायोटेकला रशियाच्या 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे. 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती करणारी पॅनेशिया ही पहिली कंपनी ठरणार आहे. रशियानं कोरोना लसीबाबत सहा कंपन्यांसोबत करार केले आहेत. त्यात पॅनेशिया बायोटेक कंपनीचा देखील समावेश आहे. (Panacea Biotec to make Sputnik V in India DCGI approves)
भारतात 'स्पुतनिक-व्ही' लसीची निर्मिती करण्यासाठीचा परवाना मिळवणं अतिशय आवश्यक आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच या लसीची निर्मिती भारतात केली जाणार आहे. यामुळे स्पुतनिक-व्ही लसीचा मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध होऊ शकणार आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेला यातून वेग प्राप्त होऊ शकेल.
रशियाची 'स्पुतनिक-व्ही' कोरोना विरोधी लस ९१.६ टक्के प्रभावी आहे. पॅनेशिया बायोटेकडून स्पुतनिक-व्ही लसीची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्राकडे पाठवण्यात आली होती. तिथं लसीची गुणवत्ता चाचणी करण्यात आली. यात कंपनीला हिरवा कंदील मिळाला असून सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी सिद्ध झाली आहे.