पणजीत आता एकेरी वाहतूक - 1 सप्टेंबरपासून लागू : महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर होणार अंमलबजावणी
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM
(फोटो : एडिट लोकमवर + आराखडा)
(फोटो : एडिट लोकमवर + आराखडा) पणजी : राजधानी शहरातील वाहतूक येत्या 1 सप्टेंबरपासून एकेरी होणार असून महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर ती राबविल्यानंतर येणार्या सूचना, हरकती विचारात घेऊन आवश्यक तेथे कायमस्वरूपी केली जाईल. वाहतूक पोलीस उपाधीक्षक धर्मेश आंगले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी ही उपाययोजना केली आहे. नव्या व्यवस्थेनुसार शहरात आता केवळ तीन ते चार रस्त्यांवरच दुहेरी वाहतूक असेल. यात पोलीस मुख्यालयासमोरचा रस्ता, आयनॉक्ससमोरील मार्गाचा समावेश आहे. मार्केटमध्ये दुकानांसाठी माल घेऊन येणार्या अवजड वाहनांकरिता ही व्यवस्था आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी सल्लामसलत करूनच एकेरी मार्ग निश्चित केले आहेत. पहिला महिनाभर प्रयोग म्हणून ही व्यवस्थात अमलात असेल. या कालावधीत वाहनधारकांना दंड ठोठावला जाणार नाही. उलट त्यांची जागृती घडवून आणली जाईल, असे आंगले यांनी स्पष्ट केले. सध्या 18 जून रस्ता आणि आत्माराम बोरकर मार्ग पूर्णपणे एकेरी आहे. ही व्यवस्था तशीच कायम ठेवली जाईल. नवी वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी अतिरिक्त 110 पोलीस तैनात केले जातील. गृहरक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था लागू असताना प्रमुख नाक्यांवर पोलीस तैनात करून वाहनधारकांमध्ये जागृती घडविण्याचेही काम केले जाईल. एकेरीमार्ग - महात्मा गांधी मार्ग (जुने सचिवालय ते काकुलो बेट)- दादा वैद्य मार्ग (हॉटेल सम्राट ते कुंडईकर नगर आणि सिंगबाळ बूक स्टॉल ते कुंडईकर नगर)- जन. बेर्नाद गिदिश मार्ग (मार्केट गेट ते धेंपो निवास)- कायतान आल्बुकर्क मार्ग (वैद्य हॉस्पिटल ते मॅन्शन गेस्ट हाउस)- मिनेझिस ब्रागांझा मार्ग (अँपल कॉर्नर ते भोसले हॉटेल)- डॉ. पिसुर्लेकर मार्ग (कुंडईकर नगर ते आझाद मैदान जंक्शन)- शिरगावकर मार्ग (महालक्ष्मी मंदिर ते गोविंदा बिल्डिंग)- स्वामी विवेकानंद मार्ग (बोक द व्हाक जंक्शन ते टू सिग्नल ट्रेनिंग सेंटर)- टी. बी. कुन्हा मार्ग (सेसॉल बार ते ए. बी. नाईक चौक)- हेलिदोर साल्गादो मार्ग (रायू चेंबर ते कामत सेंटर)- गव्हर्नादोर पेस्ताना मार्ग (बोरकर मार्ग ते मार्केट गेट व बांदोडकर मार्ग ते मार्केट गेट)- डॉ. वोल्फांगो सिल्वा मार्ग (ईडीसी हाउस ते हॉटेल त्रिमूर्ती)- इस्माइल ग्राशियस मार्ग (नवहिंद भवन ते मिनेझिस ब्रागांझा सभागृह) - अपरान्त हस्तकला दालन ते वर्षा बूक स्टॉल शहरात रोज येतात 90 हजार वाहनेएका प्रश्नावर उत्तर देताना आंगले म्हणाले की, रोज शहरात सुमारे 90 हजार वाहने प्रवेश करतात. साधारणपणे 5500 दुचाक्यांचे आणि 2200 चारचाकी वाहनांचे पार्किंग होते. पत्रकार परिषदेस वाहतूक निरीक्षक सुदेश वेळीप हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी) फोटो कॅप्शन 1. वाहतूक उपाधीक्षक धर्मेश आंगले नव्या वाहतूक व्यवस्थेची माहिती देताना. बाजूस वाहतूक निरीक्षक सुदेश वेळीप.2. लाल रंगातील मार्ग (नव्याने एकेरी होणार असलेले) तर हिरव्या रंगातील मार्ग (सध्या अस्तित्वात असलेले एकेरी)