ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - ग्रामपंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार किमान दहावी पास असलाच पाहिजे यासाठी हरयाणा सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. पंचायत निवडणूक लढवणा-या उमेदवारांसाठी ७ सप्टेंबरला हरयाणा सरकारने विधानसभेत एक कायदा मंजूर केला. त्यानुसार खुल्या वर्गातील उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असला पाहिजे तर, महिला व दलित उमेदवार हा किमान ८ वी पास आणि दलित महिला पाचवी पास असली पाहिजे.
तसेच या कायद्यानुसार, उमेदवाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, वीज बिल, कर्जाचे हप्ते थकलेले नसावेत व सगळ्यात महत्वाचेे म्हणजे घरात शौचालय असले पाहिजे, अशा अटी या कायद्याद्वारे घालण्यात आल्या आहेत.
या कायद्यामुळे उमेदवाराच्या निवडणूक लढवण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते असा आक्षेप घेत ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोशिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती देत, हरयाणा सरकारला नोटीस बजावली होती.