जमशेदपूर : लोकशाही बळकट बनविण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशाल संसाधने आणि सरकारच्या योजनांचा पुरेपूर लाभ येऊन विकासाच्या संदर्भातील कार्यक्रमात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जमशेदपूर येथे केले.‘पंचायत दिना’निमित्त आयोजित ‘ग्राम उदयातून भारत उदय’ कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, देशाची प्रगती गावांच्या विकासावर निर्भर आहे. दुर्गम भागांमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सोई-सुविधा पोहोचवून शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये असलेले अंतर कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला आणि बालकांच्या देखभालीसह विकासावर भर देताना मोदी म्हणाले, ‘येणाऱ्या वर्षांत ज्याची असामान्य उपलब्ध व कामगिरी म्हणून उल्लेख केला जाईल, असा एका वारसा माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात देण्याची माझी इच्छा आहे. आम्ही पंचायतींचा बळकट बनविले पाहिजे. ग्रामसभा या संसदेएवढ्याच महत्त्वाच्या आहेत.ग्रामपंचायती आणि केंद्र सरकार यांच्यादरम्यान सहकार्य असण्यावर भर देताना मोदी पुढे म्हणाले की, आम्हाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल. त्यासाठी सरपंचांनी विकास कार्यक्रमात प्रमुख भूमिका बजावली पाहिजे. सरपंचांनी पायाभूत सुविधा निर्माण करणे, उघड्यावर शौच करणे बंद व्हावे यासाठी शौचालये बांधणे, बालमृत्यू दर कमी करण्यासाठी उचित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि मुले शाळा सोडणार नाही यासाठी चांगल्या शिक्षणाची तरतूद करण्याच्या कामात प्रमुख भूमिका बजावली पाहिजे. (वृत्तसंस्था)>दौऱ्यापूर्वी हिंसाचारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झारखंड दौऱ्याचा विरोध आणि मोदी सरकारच्या नव्या मूलनिवासी धोरणाचा निषेध करण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाने झारखंड बंदचे आयोजन केले होते. या बंदला हिंसक वळण लागले. मोदी हे जमशेदपूर येथे पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजर होण्याच्या काही तासाआधी बंद समर्थकांनी पूर्व सिंघभूम जिल्ह्यात प्रचंड जाळपोळ केली. बस व पाण्याचा टँकर जाळण्यात आला. ही बस भाजपा कार्यकर्त्यांना मोदी येणार असलेल्या कार्यक्रमस्थळी घेऊन जाण्यासाठी तयार करण्यात आली होती. याशिवाय बंद समर्थकांनी अनेक रस्त्यांवर झाडे व दगड ठेवून वाहतूक अडविली. यावेळी झामुमोच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पंचायतींनी पुढाकार घ्यावा - मोदी
By admin | Published: April 25, 2016 4:22 AM