उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांचे वारे आता वाहू लागले असून सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरताना दिसतायत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. भाजपचे पंचायत राज मंत्री भूपेंद्र सिंह चौधरी यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (AIMIM Asaduddin Owaisi) यांच्यावर त्यानं जोरदार निशाणा साधला आहे. शामली येथे आयोजित एका युवा संमेलनाला संबोधित करताना त्यांनी ओवेसींवर टीकेचा बाण सोडला.
भूपेंद्र सिंह चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं आहे. "मी सभेत उपस्थित लोकांना सांगितलं, उत्तर प्रदेशात जर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ सत्तेत आले तर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी जानवं घालून प्रभू श्रीरामाच्या नावाचा जाप करतील," असं ते म्हणाले. यानंतर ओवेसी असं का करतील? असा सवाल त्यांना करण्यात आला. "आम्ही आमचा अजेंडा पुढे नेत आहोत. आमच्या अजेंड्यानुसार अखिलेश यादव आता मंदिरांमध्ये जात आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी जानवं घालून प्रत्येकाला आपलं गोत्र सांगत आहेत. हा आमच्या विचारधारेचा प्रभाव आहे, ज्यामुळे अन्य लोकांनी आपला आपला अजेंडाच सोडला आहे," असं ते म्हणाले.
"जे तुष्टीकरणाचं राजकारण करत होते, अल्पसंख्यांकांबद्दल बोलत होते, ज्यांनी प्रभू श्रीरामाचं अस्तित्व स्वीकारलं नाही आणि ते एक काल्पनिक पात्र असल्याचं शपथपत्र न्यायालयात दिलं, तेच लोक आज जानवं घालून एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात फिरताना दिसत आहेत," असं चौधरी म्हणाले.
ओवेसींची प्रतिक्रियायासंदर्भात ओवेसी यांनाही विचारणा करण्यात आली. "कोणतीही व्यक्ती कोणतंही वक्तव्य करतं आणि त्यावर माझी प्रतिक्रिया मागितली जाते. अशा वक्तव्यांवर मी कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही," असं ओवेसी म्हणाले. ओवेसींच्या पक्षानं उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये १०० जागांवर उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.