राजकीय स्वार्थासाठी पंचकुला जळू दिले, हायकोर्टाने हरयाणा सरकारला फटकारले, केंद्र सरकारवरही ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:56 AM2017-08-27T05:56:55+5:302017-08-27T05:56:55+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविल्यानंतर, त्याच्या समर्थकांनी जो धुडगूस घातला, त्याला हरयाणा सरकारच जबाबदार आहे, असे थेट ताशेरे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने शनिवारी ओढले.
चंदीगड/पंचकुला/नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविल्यानंतर, त्याच्या समर्थकांनी जो धुडगूस घातला, त्याला हरयाणा सरकारच जबाबदार आहे, असे थेट ताशेरे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने शनिवारी ओढले. तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी पंचकुला शहर जळू दिले, अशा शब्दांत न्यायालयाने हरयाणा सरकारला व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना फटकारले.
डेरा सच्चा सौदाचे सिरसासह राज्यभरात जितके आश्रम आहेत, ते रिकामे करण्याबाबतची तुमची पूर्ण योजना आमच्याकडे सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने हरयाणा सरकारला दिले. बाबा राम रहीमला काल सीबीआय न्यायालयात आणण्यासाठीच्या ताफ्यात केवळ पाचच वाहने होती, अशी माहिती तुम्हाला कोणत्या अधिकाºयाने दिली? त्याचे नाव आम्हाला सांगा, असे आदेशही न्यायालयाने राज्याचे अॅडव्होकेट जनरल महाजन यांना दिले आहेत.
हरयाणा देशाचा भाग नाही का?
न्यायालयात केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन उपस्थित होते. त्यांनी कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे, असे प्रतिपादन करताच, न्यायालयाने त्यांना हरयाणा हा देशाचा भाग आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? असा थेट सवाल केला, तसेच पंतप्रधान हे भारताचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे नाहीत, असेही त्यांना सुनावले.
तुम्ही निर्णय अमलात येऊ दिले नाहीत
प्रशासकीय व राजकीय निर्णयांमध्ये खूपच फरक होता. प्रशासनाने घेतलेले निर्णय राजकीय नेतृत्वाने अमलात येऊ दिले नाहीत, तुम्ही आमची दिशाभूल केलीत, अशी भाषा न्यायालयाने हरयाणा सरकारच्या बाबतीत वापरली. आता तुम्ही पंचकुलाच्या पोलीस उपायुक्तांना निलंबित केले आहे, पण काल जे घडले, त्याला केवळ तो अधिकारीच जबाबदार होता की काय? असा सवालही न्यायालयाने सरकारला विचारला.
न्यायालयाने केला संताप व्यक्त
पंचकुलामध्ये राम रहीम समर्थकांनी काल केलेली दगडफेक, जाळपोळ व हिंसाचार याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारलाच जबाबदार धरले. या प्रकारानंतर पंचकुलामधील गोळीबारात २८ मरण पावले होते.
या समर्थकांनी शेकडो वाहने जाळली, रेल्वे स्टेशन, बसेस, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप यांनाही आगी लावण्यात आल्या.
या समर्थकांना पंचकुलाच्या बाहेर काढा, असे आदेश न्यायालयाने सरकारला दोनदा दिले होते. तरीही समर्थकांना हटविण्यात आले नाही आणि इतकी जाळपोळ झाली. त्यामुळे न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
डेराच्या सर्व मालमत्तांची यादी सादर करा
पंजाब व हरयाणात डेरा सच्चा सौदाच्या स्थावर व जंगम किती मालमत्ता आहेत, याची यादी आम्हाला सादर करा व पुढील सूचना मिळेपर्यंत यातील एकही मालमत्तेबाबत डेरातर्फे कोणताही व्यवहार होता कामा नये, असेही उच्च न्यायालयाने पंजाब व हरयाणा सरकारांना सांगितले आहे.
थेट मुख्यमंत्र्यांवर टीका
राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातेही आहे. गेले सात दिवस तुम्ही इतक्या लोकांना (पंचकुलामध्ये) येऊ का दिले, असा प्रश्न विचारत, मुख्यमंत्री त्यांना संरक्षण देत आहेत, अशी टीकाच न्यायालयाने मनोहरलाल खट्टर यांच्यावर केली.