पंडीत जसराज यांचं निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. अमेरिकेत त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती आहे. पं. जसराज यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. ते मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडीत मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी थोरले बंधू मेवाती घराण्याचे महाराज जयवंतसिंह वाघेला आणि उस्ताद गुलाम कादरखाँ यांच्याकडून जसराज यांनी गायनाचे उच्च शिक्षण घेतले. आग्रा घराण्याचे स्वामी वल्लभदास यांच्याकडूनही त्यांनी धडे गिरवले.शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती.
. पद्मविभूषण पंडित जसराज यांचं नाव मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांदरम्यान असलेल्या व्हीपी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रहाला 2006मध्ये देण्यात आले आहे. असा सन्मान मिळणारे पंडित जसराज हे एकमेवर भारतीय संगीत कलाकार आहेत.जसराज यांनी पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, पंडित रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले. पंडित जसराज यांच्या पश्चात्य त्यांची पत्नी मधु जसराज आणि कन्या दुर्गा जसराज आहेत