कष्टाची तयारी आणि इच्छाशक्ती असली की अशक्य असं काहीच नाही हे रविकांत नावाच्या तरुणानं सिद्ध करुन दाखवलं आहे. पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगा एअरफोर्समध्ये पायलट होईल असा विचारही कुणी केला नव्हता. पण रविकांत चौधरी यानं आज आई-वडिलांना अभिमान वाटेल असं काम केलं आहे.
रविकांत याचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं. त्यानं नुसतं स्वप्न पाहिलं नाही तर ते पूर्णत्वास नेलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं तोही आपल्या वडिलांना पाणीपुरीच्या ठेल्यावर मदत तर करायचाच. पण त्यासोबत अभ्यासही सुरू ठेवला होता. अवघ्या २१ वर्षाच्या रविकांत याची भारतीय वायुसेनेत पायलट म्हणून निवड झाली आहे. त्यानं पहिल्या प्रयत्नात Air Force Common Admission Test (AFCAT) क्लिअर केली आहे.
रविकांत यानं तर मेहनत घेतलीच पण त्याचे वडिल देवेंद्र चौधरी यांनीही त्याला पाठिंबा दिला. आर्थिक परिस्थिती हलाकीची असतानाही देवेंद्र यांनी मुलाच्या शिक्षणात कधीच अडसर येणार नाही याची काळजी घेतली. कोरोना काळात लोकांना दोन वेळचं जेवण मिळणं मुश्कील झालं होतं. देवेंद्र यांचा पाणीपुरीचा ठेलाही बंद पडला होता. मुलाचं शिक्षण आणि घरचा खर्च भागवण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली.
कुटुंबीयांचा पाठिंबा अन् कोणत्याची कोचिंग विना बनला पायलटरविकांत चौधरी म्हणाला, नीमच ही एक छावनीच आहे. इथं सीआरपीएपचं ट्रेनिंग सेंटर आहे. ते पाहूनच देशसेवेसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. जेव्हा इयत्ता १० वीत होतो तेव्हाच या क्षेत्रात येण्याचं ठरवलं होतं. देशसेवेसाठी हवाई दलाची निवड केली.
"इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर नॅशनल डिफेन्स अकादमीची स्पर्धा परीक्षा दिली. यात अनेकदा रविकांतच्या पदरात अपयश पडलं. पण हिंमत हरलो नाही. देशासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेनं प्रेरणा दिली. आई-वडीलही पाठिशी उभे राहिले. कोणत्याही कोचिंगविना घरीच इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करत राहिलो. चार वर्षांच्या मेहनतीनंतर हवाई दलात पहिल्याच प्रयत्नात सिलेक्ट झालो", असं रविकांत सांगतो.
AFCAT म्हणजे काय?Air Force Common Admission Test भारतीय हवाई दलात भरतीसाठी वर्षातून दोनवेळा घेतली जाते. या परीक्षेत यश मिळवून एअरफोर्स ऑफिसर म्हणून करिअरची सुरुवात करता येते.