गुरुदासपूर (पंजाब) : पाकिस्तान सीमेपासून अवघ्या १० ते १२ कि.मी. अंतरावरील गुरुदासपूरच्या दीनानगरमध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हा हल्ला केला.त्यानंतर हल्लेखोर दहशतवादी पोलीस ठाण्याशेजारील एका रिकाम्या इमारतीत दडून बसले होते. सुरक्षा दलासोबत तब्बल १२ तास चाललेल्या चकमकीनंतर त्यांना यमसदनी धाडण्यात आले,अशी माहिती गुरुदासपूरचे पोलीस उपायुक्त अभिनव त्रिखा यांनी दिली. या हल्ल्यात पोलीस अधीक्षक (हेरगिरी) बलजीतसिंग यांच्याशिवाय दोन होमगार्ड आणि दोन पोलीस शहीद झाले. १५ जण जखमी झाले असून त्यांच्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. गुप्तचर संस्थांना मिळाली होती गोपनीय सूचनाहल्लेखोर दहशतवादी जम्मू आणि पठाणकोटमधील खुली सीमा अथवा जम्मू जिल्ह्याच्या चकहिरा मार्गे पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसले असावेत असा संशय आहे. काही दहशतवादी भारतात घुसले असल्याची गोपनीय सूचना केंद्रीय गुप्तचर संस्थांना मिळाली होती. केंद्रीय गृहमंत्रालयातील सूचनेनुसार हे दहशतवादी रविवारी मध्यरात्री भारतात दाखल झाले आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ कि.मी. दूर पहाडपूर मार्गाचा वापर करीत राष्ट्रीय महामार्गावर आले. आजचा हल्ला जम्मूच्या कठुआ आणि हीरानगरमधील आत्मघाती हल्ल्याशी मिळताजुळता आहे. जम्मूत गेल्या वर्षी २० मार्चला लष्कराच्या पोशाखातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ६ जण ठार झाले होते. गुरुदासपूर हल्ल्यातील दहशतवाद्यांनीही लष्करी पोशाख परिधान केला होता. दरम्यान, अमृतसर-पठाणकोट रेल्वेमार्गावर पाच जिवंत बॉम्ब सापडल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या. दहशतवादी लपून बसले होते त्या इमारतीमधून शस्त्रास्त्रे आणि जीपीएस उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. त्यांच्याजवळ चीननिर्मित ग्रेनेडही होते, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)स्वात कमांडोंनी केली मोहीम फत्तेदीनानगर येथे हल्ला करीत उच्छाद मांडणाऱ्या तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्याची मोहीम पंजाबच्या स्वात चमूतील कमांडोंनी फत्ते केली. उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी पंजाबमध्ये चार वर्षांपूर्वी क्रॅक कमांडो फोर्सची स्थापना केली होती, त्याचे फळ सोमवारी मिळाले.स्वात चमूतील कमांडोंना अतिरेक्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्राणहानी टाळत अतिरेक्यांचा खात्मा करण्यात कमांडोंना यश आल्याचा उल्लेख सुखबीरसिंग यांनी एका निवेदनात केला आहे. मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये अतिरेकी दडून बसले तेव्हा त्यांना बाहेर काढण्यात महत्त्वपूर्ण वेळ वाया गेला होता, कारण राष्ट्रीय सुरक्षा गटाची (एनएसजी) चमू त्यावेळी दिल्लीत होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता पंजाबमध्ये क्रॅक कमांडो फोर्सची स्थापना करण्यात आली होती. कमांडोंना अत्याधुनिक शस्त्रे पुरवितानाच इस्रायली तज्ज्ञांकडून प्रसिक्षण देण्यात आले होते. २८ सदस्यीय कमांडो चमू अमृतसरला होती त्यामुळे लवकरच दीनानगरला हलविता आली, अशी माहिती त्यांनी दिली.असा झाला हल्ला : आधी ढाब्याला केले लक्ष्य...दहशतवाद्यांनी सर्वप्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाब्याला लक्ष्य केले आणि तेथून एका कारमधून पोबारा केला. मार्गात दीनानगर बायपासजवळ एका विक्रेत्यावर गोळीबार केला. मग पंजाब परिवहनच्या धावत्या बसमधील प्रवाशांना गोळ्या घातल्या आणि दीनानगर पोलीस ठाण्याजवळील आरोग्य केंद्राला लक्ष्य केले. तेथून हे दहशतवादी पोलीस ठाण्यात घुसले आणि गोळीबार केला. शेजारील पोलीस वसाहतींमधील घरांवर त्यांनी ग्रेनेड फेकले.कार हिसकावलीदहशतवाद्यांनी कमलजीतसिंग मथारु यांच्यावर गोळीबार करून त्यांची कार हिसकावून घेतली. मथारु जखमी झाले आहेत. मृतांमध्ये गुलाम रसूल, आशा राणी व अमरजितसिंग यांचा समावेश आहे.पंजाबमधील आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले१९८० च्या दशकानंतर अनेक वर्ष खलिस्तानवाद्यांच्या हिंसाचारात पंजाब होरपळून निघाला होता. या काळात शेवटचा दहशतवादी हल्ला १४ आॅक्टोबर २००७ रोजी लुधियानात झाला होता. येथील सिनेमागृहातील शक्तिशाली बॉम्बस्फोटात ७ जण ठार तर ३० जखमी झाले होते. राज्यात मागील १५ वर्षात २००१ ते २०१५ या कालावधीत झालेले मोठे हल्ले१ मार्च २००१ : पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्णात भारत-पाक सीमेवर ४५ फूट लांब गुप्त भुयाराचा शोध लागला होता. पाकिस्तानी सुरक्षा दलाने या भुयाराचा त्यांच्याकडील भाग उद्ध्वस्त केला आहे.१ जानेवारी २००२: पंजाबच्या हिमाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवरील दमताल फायरिंग रेंजमध्ये अज्ञात दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात लष्कराचे ३ जवान शहीद आणि ५ जखमी झाले होते.३१जानेवारी २००२: होशियारपूर जिल्ह्णाच्या पतरानामध्ये पंजाब परिवहनच्या बसमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात दोन जण ठार तर १२ जखमी झाले होते.३१मार्च २००२: लुधियानापासून सुमारे २० किमी अंतरावरील दारोहामध्ये फिरोजपूर-धनबाद एक्स्प्रेस गाडीला बॉम्बस्फोटात दोन जण ठार २८ जखमी झाले होते.२८एप्रिल २००६: जालंधर बस टर्मिनलवर ४५ प्रवासींना घेऊन जात असलेल्या बसमधील स्फोटात किमान आठजण जखमी झाले होते. मग सीमा बंद का केल्या नाहीत?चंदीगड : पंजाबमध्ये हल्ला होणार अशी माहिती गुप्तचर यंत्रणाकडे असेल तर सीमा बंद का केल्या नाहीत, असा सवाल करीत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.अतिरेकी पंजाबमधून नव्हे तर सीमेपलीकडून आले आहेत. गुप्तचर यंत्रणांकडे माहिती असेल तर त्या बंद करणे हे केंद्राचे काम आहे, असेही ते ठामपणे म्हणाले.
गुप्तचर यंत्रणेचे अपयश -काँग्रेसनवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न चालविले आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळेच अतिरेक्यांना हल्ला करता आला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी दिली आहे.गुप्तचर यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय आणि राजकीय अपयशाची ही परिणती आहे. मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानने ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना २०१३-१४ या वर्षाच्या काळातील घटनांच्या तुलनेत या घटना ८ पटीने जास्त आहेत. यावरून हे सरकार अंतर्गत सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, हेच दिसून येते, असे ते म्हणाले.
पुन्हा दहशतवादचंदीगड : पंजाबला पुन्हा दहशतवादाचा धोका निर्माण झाल्याचा दावा करून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व गुरदासपूरचे माजी खासदार प्रतापसिंग बज्वा यांनी गुरदासपूरमधील सोमवारचा दहशतवादी हल्ला केंद्र आणि राज्य सरकारसाठी धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले. राज्याला आधीच दहशतवादाची पार्श्वभूमी आहे. पंजाबने दहशतवादाचे काळेकुट्ट दिवस अनुभवले आहेत. आजची घटना अत्यंत गंभीर असून पंजाब पुन्हा एकदा दहशतवादाच्या सावटाखाली आला आहे.
ओमर अब्दुल्लाजम्मू : काश्मीरमध्ये नवी आघाडी उघडण्याच्या उद्देशाने अतिरेक्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे, असे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवालनवी दिल्ली : गुरदासपूर जिल्ह्यातील हल्ल्याला भ्याड कृत्य संबोधून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी या हल्ल्याचा निषेध केला.