नवी दिल्ली - भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं 1 एप्रिलपासून बस आणि टॅक्सीमध्ये पॅनिक बटन बसवणं सक्तीचं केलं आहे. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हे बटन कार्यान्वित होणार असून, 1 एप्रिल 2018पासून हे प्रत्येक बस आणि टॅक्सीमध्ये बसवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. तसेच या मुदतीत कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचं भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. परंतु ही सक्ती रिक्षा किंवा ई-रिक्षांना लागू नसेल, असंही भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपत्कालीन स्थितीत साहाय्यभूत व्हावे, यासाठी सर्व मोबाइल फोनमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देऊ शकणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या सूचना सरकारने मोबाइल उत्पादक कंपन्यांना केल्या होत्या. दूरसंचार विभागाने या संबंधीचा आदेश जारी केला आहे. या आधी विभागाने कंपन्यांना 1 जानेवारी 2017 नंतर विकणाऱ्या सर्व फोनमध्ये ही सुविधा देण्याचे आदेश दिले होते. आता सध्या अस्तित्वात असलेल्या फोनमध्येच ही सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे. हँडसेट उत्पादक कंपन्यांना दिलेल्या निर्देशांत दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, सध्या ग्राहकांकडे असलेल्या हँडसेटमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देणारे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यासाठी किरकोळ विक्री केंद्रांवर व्यवस्था करण्यात यावी.जारी आदेशानुसार की-पॅडवरील 5 किंवा 9 क्रमांकाचे बटन दाबल्यास आपत्कालीन क्रमांक 112वर फोन लागेल. 112 हा आपत्कालीन क्रमांक 1 जानेवारीपासून कार्यान्वित होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व आपत्कालीन सेवांच्या क्रमांकाची जागा हाच एकमेव क्रमांक घेईल. सध्या पोलिसांसाठी 100, तर अॅम्बुलन्स सेवेसाठी 102 हा क्रमांक वापरला जातो. 112 क्रमांकाची सेवा पूर्णांशाने सुरू झाल्यानंतर हे क्रमांक बंद होतील. महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ‘पॅनिक बटन’, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहनाचा शोध घेणारे उपकरण लावणे बंधनकारक करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती.
‘निर्भयाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सर्व सार्वजनिक बसगाड्यांमध्ये आपत्कालीन पॅनिक बटन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस उपकरण लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे’, असे गडकरी म्हणाले होते. नवी दिल्ली येथे राजस्थान सरकारच्या एका पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ केल्यानंतर गडकरी पत्रकारांशी बोलत होते. या प्रकल्पांतर्गत राजस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपत्कालीन बटन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेल्या आपल्या दहा लक्झरी बसगाड्या व दहा सामान्य बसगाड्यांचे परिचालन करेल. या यंत्रणेची निगराणी स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षातून केली जाणार आहे.