कोलकाता - विषारी माशी अॅसिड फ्लाय किंवा नैरोबी फ्लायच्या संसर्गामुळे उत्तर बंगालमधील अनेक भागात दहशत निर्माण झाली आहे. दार्जिलिंग जिल्हा प्रशासनाने या धोकादायक माशीपासून बचाव करण्यासाठी एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. अॅसिड माशीचा संसर्ग पहिल्यांदा सिक्कीममध्ये दिसले होते. तेव्हापासून ते आसपासच्या परिसरात पसरले आहे. उत्तर बंगाल विश्वविद्यापीठ (एनबीयू), सिलिगुडीच्या सुमारे १०० विद्यार्थी यामुळे बाधित झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी वसतीगृह सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की, विषारी अॅसिड माशीचा संसर्ग पहिल्यांदा सिक्कीममध्ये दिसला होता. तसेच तेव्हापासून हा संसर्ग इतर भागात पसरला आहे. या संसर्गामुळे मुख्यत्वेकरून मुले आणि संवेदनशील त्वचा असलेले लोक बाधित होत आहेत. दार्जिलिंगचे जिल्हा मॅजिस्ट्रेट एस. पोन्नम्बलम यांनी सांगितले की, आम्ही लोकांना संपूर्ण शरीर कपड्यांनी झाकण्याचे, संध्याकाळी बाहेर जाणे टाळण्याचे, मच्छरदाणीचा वापर करण्याचे, घरामध्ये मंद प्रकाश ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संसर्ग झाल्यास लोकांनी त्वरित उपचारांसाठी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
दार्जिलिंगच्या जिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले की, दार्जिलिंगमध्ये आतापर्यंत अॅसिड माशीने चावा घेतल्याचे तीन ते चार रुग्ण सापडले आहेत. मात्र त्यामधील कुणालाही रुग्णालयात दाखल करावे लागलेले नाही. त्यामुळे या परिस्थितीत फार धोका आहे असे दिसत नाही, लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहान त्यांनी केलं आहे.