हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पानीपत जेलचे डीएसपी जोगिंदर देसवाल जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. डीएसपी जोगिंदर देसवाल हे कर्नालच्या न्यायपुरी भागात राहत होते. ते 52 वर्षांचे होते.
जोगिंदर देसवाल हे कर्नाल कारागृहाचे डीएसपीही होते. सध्या ते पानिपत कारागृहाचे डीएसपी होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सुख-दु:खात मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे असं त्याच्या मित्रांनी सांगितलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत.
डीएसपीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, ते पहाटे जिममध्ये व्यायाम करत होते. याच दरम्यान ते अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डीएसपी यांच्या निधनानंतर पानिपत पोलीस प्रशासनासह हरियाणा पोलिसांनाही धक्का बसला आहे.
हरियाणामध्ये हार्ट अटॅकने दररोज सरासरी 33 लोकांचा मृत्यू होत आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आरोग्यमंत्री अनिल विज यांनी हा अहवाल सभागृहात मांडला होता. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी सांगितले की, राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै या कालावधीत हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युयरमुळे एकूण 7026 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.