जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले हरियाणातील पानिपत येथील मेजर आशिष धौनचक यांच्या पालकांनी आपली व्यथा मांडली आहे. २०२३ मध्ये आपला मुलगा शहीद झाल्यानंतर त्यांच्या सुनेने मुलाची कार, दागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. सुनेने अर्ध्या घराला कुलूप लावलं आहे. आता वृद्ध आई-वडिलांनी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याकडे दाद मागितली आहे. आपल्या सुनेच्या अशा वागण्याला कंटाळून आशिष यांच्या वडिलांनी आता आपल्या सुनेच्या सरकारी नोकरीला विरोध केला आहे.
शक्य असल्यास ही नोकरी आपल्या मुलीला द्यावी, जेणेकरून ती आम्हाला आमच्या म्हातारपणात मदत करू शकेल, अशी विनंती त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या शहीद आशिष यांची आई कमला देवी म्हणाल्या की, सप्टेंबर २०२३ मध्ये जेव्हा त्यांचा मुलगा शहीद झाला तेव्हा संपूर्ण देश त्यांच्यासोबत होता. त्यावेळी त्यांचा मुलगा संपूर्ण देशाचा सुपुत्र होता. पण एक वर्षही उलटत नाही तोच लोक त्यांच्या मुलाला विसरले आहेत. सुनेनेही त्यांना मोठा धोका दिला आहे. सून अर्ध्या घराला कुलूप लावून येथून निघून गेली आहे.
सुनेच्या नोकरीला विरोध
सुनेने घरातून जाताना आपल्या मुलाची कार, ३० तोळं सोनं व इतर मौल्यवान वस्तूही सोबत नेल्या. कमला देवी म्हणाल्या की, त्यांना या गोष्टीचाही पश्चात्ताप नाही, पण दुःखाची गोष्ट म्हणजे सून त्यांना नातवाशी बोलू देत नाही. या वृद्ध महिलेने सीएम नायब सैनी यांची भेट घेऊन आपला मुलगा शहीद झाल्यानंतर आपल्या सुनेला मिळणाऱ्या सरकारी नोकरीला विरोध केला आहे. सुनेला ही नोकरी मिळाली तर म्हातारपणी त्यांची काळजी घेणारं कोणी नसेल, असं म्हटलं. तसेच त्यांनी आपल्या मुलीला ही नोकरी मिळवून देण्याची विनंती केली आहे.
तेरावं झाल्यावर घरातून निघून गेली सून
मुलीला ही नोकरी मिळाल्यास ती आपला सांभाळ करत राहील, असं सांगितलं. आशिष यांचं तेरावं झाल्यावर त्यांची सून घरातून निघून गेली होती. तेव्हापासून ११ महिने झाले आहेत आणि आजपर्यंत ती घरी परत आली नाही. अशा परिस्थितीत पेन्शनवर वृद्ध दाम्पत्य कसंतरी जगत आहे. त्यांची विनंती ऐकून राज्याचे पंचायत आणि सहकार मंत्री महिपाल ढांडा यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. शहीद मेजरच्या पत्नीला नोकरी न देण्याची शिफारस त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.