पानिपतमध्ये व्हॅन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका ६ वर्षीय शाळकरी मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. सेक्टर-२९ पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतून घरी आलेल्या एका ६ वर्षीय विद्यार्थिनीचा व्हॅनने चिरडल्यामुळे मृत्यू झाला.
शाळेतून मुलगी रोज व्हॅनने घरी परत यायची. ती व्हॅनमधून खाली उतरली आणि आपल्या वडिलांच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान व्हॅन चालकाने व्हॅन सुरू केली. मुलीला व्हॅनचा जोरदार धक्का बसला आणि ती खाली पडली. त्यानंतर व्हॅनची चाकं मुलीच्या अंगावरून गेली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सहा वर्षांच्या मुलीचा यामध्ये मृत्यू झाला. वडिलांच्या कुशीतच तिने शेवटचा श्वास घेतला. रुची असं या चिमुकलीचं नाव असून ती फ्लोरा चौक येथील जेएमडी स्कूलमध्ये एलकेजीमध्ये शिकत होती. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलीचे वडील अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तीन मुली आहेत. मोठ्या मुलीचं नाव मासूम (८), तर दुसरी मुलगी रुची होती, जी एलकेजीची विद्यार्थिनी होती. तिसरी मुलगी जिया १ वर्षाची आहे. वडिलांनी सांगितलं की, ते रेशनचं दुकान चालवतात. त्यांची मुलगी रुचीचा जन्म १३ जानेवारी २०१९ रोजी झाला.
१३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास मुलगी शाळेतून परतत होती. ती इको व्हॅनने शाळेत जात असे. ती याच गाडीतून घरी परतायची. बुधवारी ती व्हॅनमधून उतरून येत असताना व्हॅनने तिला चिरडलं. याच दरम्यान मागचा टायर मुलीच्या अंगावरून गेला. या घटनेनंतर वडिलांनी लगेचच मुलीला खासगी रुग्णालयात नेलं, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
डीएसपी मुख्यालय सतीश वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध सेक्टर २९ पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०६ आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व्हॅन चालक सध्या फरार आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.