पानीपत: देशाची शान असलेला तिरंगा भारतीयांना जीवापेक्षा प्रिय आहे. तिरंग्यासाठी सीमेवर जवान आपल्या प्राणाचे बलिदान देण्यासाठी तयार असतात. फक्त सीमेवरच नाही, तर देशातही लोक आपल्या तिरंग्याची शान कमी होऊ देत नाहीत. अशीच एक घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली आहे. अग्निशमन विभागात तैनात असलेल्या सुनील मेहला यांनी तिरंग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, पानीपत शहरातील भारत नगर येथील एका सूतगिरणीला मंगळवारी भीषण आग लागली. आगीच्या वेळी मिलच्या मुख्य गेटच्या छतावर एक तिरंगा फडकत होता. हा तिरंगा आगीत जळाला असता, पण जिगरबाज सुनील यांची नजर तिरंग्यावर पडली. यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुनील छतावर चढले आणि तिरंगा सुखरुप खाली आणून शेजारच्या कारखान्यात आदराने ठेवला.
फायरमन सुनील मेहला यांनी दैनिक भास्करशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले की, आम्हाला सुरुवातीपासूनच प्रशिक्षण दिले जाते की, जेव्हा जाळपोळ होण्याची घटना घडते, तेव्हा त्या भागावर सर्व बाजूंनी लक्ष ठेवले पाहिजे. मी इकडे तिकडे पाहत होतो, तेव्हा माझी नजर तिरंग्याकडे गेली. त्यावेळी माझ्या मनात एवढंच होतं की, तिरंगा आगीत जळाला नाही पाहिजे, यासाठी स्वतःचा जीव धोक्यात गेला तरी चालेल.
आपल्या देशाचा अभिमान जळत होता, त्यासाठी मी जीव धोक्यात घातला. मी फायर इंजिन चालवत होतो. तिरंग्याच्या छतापासून काही अंतरावर गाडी उभी होती. मी आधी ती गाडी मुख्य गेटवर आणली. इथे भिंतीला लागून असलेल्या छताच्या खाली गाडी लावली आणि छतावर चढलो. यावेळी सहकारी कर्मचारी बॅकअपसाठी तयार झाले. उत्साह इतका होता की काही सेकंदातच छतावर चढलो आणि लगेच तिरंगा काढून खाली आलो. तिरंगा वाचला, याचा मला खूप आनंद आहे, असे सुनील म्हणाले.