नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घटनामुळे चर्चेत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये कुठून आले, यासंदर्भातील प्रश्न ते सातत्याने करत आहेत. त्यातच, गुजरातमधील सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावली, त्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. या घटनांमुळे राहुल गांधी सध्या केंद्रस्थानी आहेत. मात्र, या राजकीय उलथापालथ आणि घडामोडींमध्येही त्यांनी जुन्या दिल्लीत जाऊन रस्त्यावर उभारुन चॅट मसाला आणि पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटला. यावेळी, राहुल गांधींना पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत असण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी जुन्या दिल्लीतील मटिया महल मार्केटला भेट दिली. यावेळीचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रमजान महिन्याच्या उत्साही वातावरणात दिल्लीच्या कनॉट प्लेसजवळील बंगाली मार्केट आणि चांदनी चौक परिसरात त्यांनी मुस्लीम बांधवांची भेट घेतली. त्यांनी याठिकाणी काही लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेतला. बंगाली मार्केटमध्ये, राहुल गांधींनी पाणीपुरीवर ताव मारला. दिल्लीतील मोहब्बत का शरबत या दुकानात कलिंगडदेखील खाल्ले.
जामा मशिदीसमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांसोबत राहुल गांधींनी सेल्फीही घेतला. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आणि आक्रमक भूमिकेमुळे राहुल गांधी माध्यमांमध्ये चर्चेत होते. मात्र, त्यांचा हा सर्वसामान्य अवतार अनेकांना अचंबित करणारा ठरला. भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी अशाचप्रकारे रस्त्यावरुन चालताना सर्वसामान्य लोकांच्या गाठीभेट घेत संवाद साधला होता. आता रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राहुल गांधींनी लोकांसोबत रस्त्यावर उभारुन चॅट मसाला आणि पाणीपुरी खाण्याचा आनंद घेतला. दरम्यान, राहुल गांधींचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत.