महाराष्ट्र सदन घोटाळा : विशेष एसीबी न्यायालयाकडून दिलासामुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी पंकज भुजबळ यांची बुधवारी विशेष एसीबी (लाचलुचपत प्रतिबंध विभाग) न्यायालयाने जामिनावर सुटका केली. मात्र अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) टांगती तलवार पंकज भुजबळांवर कायम आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाच निर्णय घेणार आहे.विशेष एसबी न्यायालयाने यापूर्वी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचीही जामिनावर सुटका केली होती. मात्र ईडीनेही त्यांना पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रींग ॲक्ट) अंतर्गत अटक केल्याने ते दोघेही तुरुंगातच आहेत. बुधवारी विशेष न्यायालयाने पंकज भुजबळांसह तन्वीर शेख आणि संजय जोशी यांचीही ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. या तिघांसह आतापर्यंत १६ आरोपींना या केसमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र पंकज भुजबळ यांना पीएलएमए न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. उच्च न्यायालयाने त्यांना २६ ऑगस्टपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. त्यामुळे पंकज भुजबळांवर अटकेची टांगती तलवार आहे.(प्रतिनिधी)
पंकज भुजबळांना जामीन मंजूर
By admin | Published: August 10, 2016 11:21 PM