शेवगाव : माझ्या परळी मतदारसंघाइतकेच प्रेम शेवगाव परिसरावर असून शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत परिवर्र्तन करा, अधिकाधिक विकासाच्या माध्यमातून शहराचा चेहरा बदलवू. आपले हे निवडणुकीपुरते आश्वासन नसून काळजापासूनची भावना असल्याचे अभिवचन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.शेवगाव नगरपरिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवारांच्या प्राचारार्थ येथे आयोजित सभेत मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड होते. माजी आमदार पाशा पटेल, राजीव राजळे, आमदार मोनिका राजळे, ज्येष्ठ नेते दिलीप लांडे, जि.प. सदस्या हर्षदा काकडे, संतोष गायकवाड, शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे व्यासपीठावर होते. मंत्री मुंडे म्हणाल्या, शेवगाव शहरात गेली कित्येक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यांनी सत्तेवर येताना आश्वासनांची खैरात केली. मात्र आपल्या कार्यकाळात विकास तर लांब, साधी ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत बांधली नाही. आता हीच मंडळी पुन्हा सत्तेवर जोगवा मागण्यासाठी लोकांसमोर आलेली आहे. त्यांना जनतेचे आशीर्वाद कमविता आले नाहीत. आज त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नसल्याने ते कोणता विकास करणार, हे सुज्ञांना सांगण्याची आवश्यकता नाही.अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा तितकाच दोषी असल्याने शेवगावच्या सुज्ञ जनतेने यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन करावे. विकास काय असतो, ते आम्ही येथील जनतेला दाखवून देवू. दिलेला शब्द पाळण्याची आमची परंपरा आहे. जनतेला आम्ही वार्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी प्रास्ताविक केले. जि.प.च्या कृषी समितेचे माजी सभापती दिलीप लांडे यांनी राष्ट्रवादीवर टीकेची तोफ डागली. त्यांनी केवळ पैशाच्या जीवावर राजकारण केले. शासनाकडून विकासासाठी आलेला पैसा खिशात घातला. त्यांच्या समर्थकांनी गावातील सार्वजनिक मुतार्याही विकल्या. प्रत्येक निवडणुकीत लोकांना विकत घेण्याची त्यांची भाषा अशोभनीय आहे. आता जनतेने त्यांची मस्ती मतपेटीद्वारे उतरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. माजी आमदार पाशा पटेल, आमदार मोनिका राजळे यांचीही भाषणे झाली. शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी सूत्रसंचालन केेले. तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी आभार मानले.
विकासाच्या माध्यमातून बदल घडवू - पंकजा मुंडे
By admin | Published: January 08, 2016 11:19 PM