कोणाचं नशीब हे कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये घडली आहे. एका शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. मौल्यवान हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात पुन्हा एकदा एका शेतकऱ्याचं नशीब उजळलं आहे. शेतकरी आणि मनोरचे सरपंच प्रकाश मजूमदार यांनी त्यांच्या पाच साथीदारांसह जरुआपूर खासगी क्षेत्रात खोदकाम सुरू केलं. ज्यामध्ये 14.21 कॅरेटचा हिरा मिळाला आहे.
प्रकाश मजुमदार यांना याआधीही सुमारे 12 हिरे मिळाले आहेत, त्यातील हा सर्वात मोठा हिरा आहे. त्यांनी साथीदारांसह मिळून हा हिरा कार्यालयात जमा केला आहे. सरपंच प्रकाश मजुमदार यांनी सांगितलं की, हिऱ्याच्या लिलावानंतर मिळालेली रक्कम ते समप्रमाणात विभागतील आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतील. तर हिऱ्याचे जाणकार अनुपम सिंग यांनी सांगितलं की, हा हिरा आगामी लिलावात ठेवण्यात येणार आहे. या वर्षातील हा सर्वात मोठा हिरा असल्याचं सांगितलं जात आहे.
एकामागून एक 11 हिरे मिळाले
शेतीत फायदा होत नसल्याचे पाहून शेतकरी प्रकाश यांनी त्यांच्या काही मित्रांसह 2019-20 मध्ये हिऱ्याच्य़ा खाणीत काम सुरू केले. यानंतर त्यांना एकामागून एक 11 हिरे मिळाले. यामध्ये 7.44 कॅरेट, 6.44 कॅरेट, 4.50 कॅरेट, 3.64 कॅरेटसह काही छोटे हिरे सापडले आहेत. 2022 मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत प्रकाश यांनी सरपंचपदाची निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकली.
पाचही जणांचं नशीब उजळलं
सरपंच झाल्यानंतर प्रकाश यांना 3.64 कॅरेटचा हिरा आणि 12 डिसेंबर रोजी सापडलेला एक हिरा असे दोन हिरे मिळाले आहेत. यावेळी सरपंचासह भारत मजुमदार, दिलीप मेस्त्री, रामगणेश यादव, संतू यादव यांचाही हिस्सा आहे. त्यांनी स्वतः खाणीत कष्ट केलं आणि कामगारांकडून काही कामं करून घेतली. यानंतर या पाचही जणांचं नशीब उजळलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"