नवी दिल्ली - बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय सहकारी आचार्य बाळकृष्ण यांना दिल्लीच्याएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळकृष्ण यांना 'आल्टर्ड कान्शसनेस' स्थितीत दाखल करण्यात आले. आल्टर्ड कन्शसनेस म्हणजे, या स्थितीत पीडित रुग्ण आपल्या आजुबाजूच्या व्यक्तींना ओळखू शकत नाही. तसेच, सद्यपरिस्थीचेही भान या व्यक्तीला राहात नाही.
आचार्य बालकृष्ण यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यानंतर छातीतील दुखणे आणि अस्वस्थतेमुळे त्यांना हरिद्वार येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांकडून थेट एम्समध्ये रेफर करण्यात आले. सायंकाळी सव्वा चार वाजता आचार्य बालकृष्ण यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे एम्सचे अधीक्षक ब्रह्मप्रकाश यांनी सांगितले. सध्या, या डॉक्टरांची एक खास टीम आचार्यांच्या देखभालीसाठी ठेवण्यात आली आहे. आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती स्थिरी असून अद्याप काही वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल येणे बाकी असल्याचेही, ब्रह्मप्रकाश यांनी म्हटले आहे.