एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : मंत्रालयाला सादर करण्यात आलेल्या तपासणी अहवालानुसार परीक्षा सुरू होण्यापूर्वीच नीट यूजीचा पेपर लीक झाला होता. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील ओएसिस शाळेतून हा पेपर फुटला होता. त्यानंतर तेथून बिहारसह इतर ठिकाणी हा पेपर पाठवण्यात आला. हे पेपर माफियांच्या व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आले होते.
नालंदातील नूरसराय उद्यान महाविद्यालयाचा कर्मचारी संजीव मुखिया पेपर लीक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. संजीव मुखिया त्याच्या टोळीसह अनेक महिन्यांपूर्वीच नीट परीक्षेचा फॉर्म लीक करण्याचा कट रचत होता. परीक्षेपूर्वीच एका प्राध्यापकाने संजीव मुखिया याला व्हॉट्सॲपवर पेपर पाठवला होता. यानंतर पाटणा आणि रांची येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने पेपर सोडवण्यात आला. त्यानंतर बलदेव याच्या मोबाइलवर हा पेपर पाठवून परीक्षार्थीना देण्यात आला.
ज्यांनी पेपर सोडविला त्यांची नावे समोरज्या डॉक्टरांनी नीट परीक्षेचा पेपर सोडवला त्यांची नावेदेखील पथकाला मिळाली आहेत.नीटचे पेपर्स केंद्राबाहेर सोडविलेल्या आणि रांचीच्या मेडिकल कॉलेजच्या १० पीजी डॉक्टरांचा शोध घेतला जात आहे.पथकाला आरोपीच्या व्हॉट्सॲप चॅटवरून समजले की, परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका एका डॉक्टरच्या नंबरवर पाठविण्यात आली होती.
पेपर फुटल्याची खात्री कशी झाली?- याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुन्हे शाखेचे एडीजी नय्यर हसनैन खान यांना दिल्लीत बोलवून नीट परीक्षेच्या पेपर लीकशी संबंधित माहिती मिळविली.- नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे तथ्यांवरून स्पष्ट झाल्यानंतरच केंद्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.
नीट पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाइंडशी संबंधित पुरावे माझ्याकडे आहेत. अनेक राजकारण्यांसह मास्टरमाइंडची छायाचित्रेही माझ्याकडे आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास ते फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करणार आहे. - तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते, बिहार
परीक्षा रद्द करणे ही एकवेळची घटना नसून, केंद्र सरकारच्या अकार्यक्षम आणि मोडकळीस आलेल्या प्रणालीच्या शवपेटीतील शेवटचा खिळा आहे. परीक्षा रद्द केल्याने हजारो डॉक्टर निराशेच्या गर्तेत गेले आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात आशा आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण व्हायला हवा. एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तामिळनाडू