नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता 10 वीच्या गणित आणि १२ वीच्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेची व्हॉट्सअॅपवर विक्री झाल्याचं समोर आलं आहे. हे पेपर विद्यार्थ्यांनी एक हजार रुपयांपासून ते 35 हजारापर्यंत विकत घेतले. सुरूवातीला एका व्यक्तीने पेपर खरेदी करून इतरांना तो विकल्याचं उघड झालं आहे. एका विद्यार्थ्याने 35 हजार रुपयाला पेपर खरेदी करून तो इतर पाच विद्यार्थ्यांना 10-10 हजार रुपयांना विकला. ज्याने 10 हजार रुपयांना पेपर खरेदी केला त्या व्यक्तीने 5-5 हजार रुपयांना फॉरवर्ड केला. पाच हजार रुपयात पेपर विकत घेणाऱ्याने तोच पेपर एक-एक हजाराला इतरांना दिला. मोबाईलवरून फॉरवर्ड करण्यात आल्याने काही तासाच्या आत हा पेपर अनेक विद्यार्थी, शिक्षकांच्या मोबाईलपर्यंत पोहोचला.
पेपर लिक करणाऱ्या व्हॉट्सअॅप चेनचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे. हे चेन मोठी असल्याने मुख्य आरोपीपर्यंत पोहचायला पोलिसांना वेळ लागणार आहे. सध्या पोलीस पेपर फॉरवर्ड करणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. विद्यार्थ्यांची चौकशी करून मुख्य आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी ही कारवाई सुरू आहे.
दरम्यान, १२वीचा अर्थशास्त्रचा पेपर व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यामध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपवर पेपर आल्याने तो इतर मुलांना दिला. त्यांची परीक्षेसाठी तयारी चांगली व्हावी यासाठी मुलांना पेपर दिल्याचं स्पष्टीकरण या शिक्षकाने पोलिसांसमोर दिलं आहे.