गुवाहाटी/ कोलकाता : प. बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारी पार पडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा मुकाबला करावा लागत असताना आसाममध्ये काँग्रेसच्या तरुण गोगाई यांना सत्ता कायम राखणे कसोटीचे ठरणार आहे. प. बंगालमधील माओवादग्रस्त भागात मतदान होत असल्यामुळे चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.प. बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यांमध्ये नवी सरकारे निवडली जाणार असून महिन्यापूर्वीच निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. पहिल्या टप्प्यात प. बंगालमधील १८, तर आसाममधील ६५ मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. प. बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होत असले तरी ११ एप्रिल रोजीही पहिल्या टप्प्यातील काही मतदारसंघ समाविष्ट केले जाणार असल्यामुळे मतदानाच्या ७ तारखा राहतील. आसाममध्ये मतदान दोन टप्प्यांत होत आहे. (वृत्तसंस्था)> समीकरण बदलले....२०११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने युती केल्यामुळे डाव्या आघाडीची ३४ वर्षांपासूनची सत्ता उलथविली गेली होती. त्यानंतर काँग्रेसने तृणमूलशी काडीमोड घेतला. आता काँग्रेस- डाव्या आघाडीने ममता बॅनर्जी यांच्यासमोर जबर आव्हान उभे केले आहे.> प. बंगालमध्ये सोमवारी प. मिदनापूर, पुरुलिया आणि बांकुरा या माओवादग्रस्त संवेदनशील भागात मतदान होत असून १३३ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. अप्पर आसाम, पर्वतीय जिल्हे, उत्तर आणि बराक खोऱ्यांमध्ये ४० हजारांवर सुरक्षा जवान तैनात आहेत. भाजप-आगप-बीपीएफच्या आघाडीने काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या असताना एआययूडीएफने वेगळी चूल ठेवल्यामुळे तिरंगी लढती रंगणार आहेत.निवडणूक आयोगाने १८ पैकी १३ मतदारसंघांमध्ये डाव्या दहशतवादाचा प्रभाव आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी ४ वाजताच मतदान आटोपले जाईल. पुरुलिया जिल्ह्याचा काही भाग, मनबाजार, काशीपूर, पारा आणि रघुनाथपूरमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालेल.
प. बंगाल, आसाममध्ये आज पहिला टप्पा
By admin | Published: April 04, 2016 2:48 AM