कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसाचारात १२ ठार तर ४३ जण जखमी झाले आहेत. राज्यात ६० हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असतानाही उसळलेला हिंसाचार रोखता आला नाही. दिवसभरात ७३ टक्के इतके मतदान झाले.सत्ता टिकवू पाहाणारी तृणमूल काँग्रेस, अस्तित्व राखण्यासाठी चाललेली काँग्रेसची धडपड व सत्ता हाती नसल्याने गलितगात्र असलेला माकप व अन्य डावे पक्ष तसेच विरोधी पक्ष तसेच अत्यंत आक्रमक बनलेला भाजपा हे पंचायत निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. राज्यातील उत्तर २४ परगणा, नादिया, दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांत झालेल्या हिंसक घटनांत तीन जण ठार झाले तर मुर्शिदाबाद येथील सुरजपूर गावात एका व्यक्तीला गोळ््या घालून ठार मारण्यात आले अशी माहिती राज्य निवडणुक आयोगाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. सूरजपूरमध्ये हत्या करण्यात आलेला व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता होता असा दावा मुर्शिदाबाद जिल्ह्यातीलभाजप नेते सुभाष मोंडल यांनी केला आहे.>बॉम्बस्फोट घडविलेदक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामध्ये तपन येथे हिंसाचारात एक व्यक्ती ठार तर चार जखमी झाले. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात व दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातही मतदानकेंद्राबाहेर बॉम्बस्फोट झाला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी मिरची पूड फेकण्याचेही प्रकार घडले.>आढळले तीन क्रूड बॉम्बउत्तर दिनजापूर जिल्ह्यातील गलईसूरामध्ये मतदान केंद्राच्या परिसरात तीन क्रूड बॉम्ब सापडले. त्यापैकी दोन क्रूड बॉम्ब हे रेल्वे रुळांवर ठेवलेले होते. या घटनेमुळे येथील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बसंती भागात मतदानकेंद्रांच्या बाहेर चेहरे झाकून घेतलेले काही बंदूकधारी फिरतानाची दृश्ये वृत्तवाहिन्यांनी दाखविली.
प. बंगालमध्ये पंचायत निवडणूक मतदानात हिंसाचार; १२ ठार, ४३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:52 AM