नवी दिल्ली: सोशल मीडियावर मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची निवड करण्यात आली आहे. ट्विटरचे (Twitter) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच पराग यांच्याकडे कंपनीची कमान सोपवतील, अशी माहिती देण्यात आली आहे. यातच आता महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून, याबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.
पराग अग्रवाल यांची ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेकांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे. स्ट्रीप कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक कॉलिसन यांनी पराग अग्रवाल यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले असून, त्यावर टेस्ला, स्पेस एक्स आणि स्टारलिंकचे प्रमुख एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनीही रिप्लाय दिला आहे.
जगभरात पसरलेल्या या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा अभिमान
गुगल, मायक्रोसॉफ्ट, एडॉब, आयबीएम, पालो ऑल्ट नेटवर्क्स आणि आता ट्विटर या कंपन्या चालवणारे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतात मोठे झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारतीयांचे अद्भूत यश वाखाणण्याजोगे आहे आणि अमेरिकेने स्थलांतरितांना दिलेल्या उत्तम संधीची चांगली आठवण आहे, असे ट्विट पॅट्रिक कॉलिसन यांनी केले आहे. यावर रिप्लाय करत आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, ही एक अशी जगभरामध्ये पसरलेली साथ आहे, ज्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा इंडियन सीईओ व्हायरस आहे. यावर कोणतीही लस नाही, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११ पासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये पराग अग्रवाल यांची ट्विटरचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. यावर, जॅक डोर्सी यांना मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करत, जॅक डोर्सी आणि आमची संपूर्ण टीम आणि भविष्यासाठी खूप उत्साही आहोत. तुमचा विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार, अशी प्रतिक्रिया पराग अग्रवाल यांनी दिली आहे.