Parakram Diwas 2023 : आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबारमधील 21 मोठ्या बेटांचे नामकरण केले. विशेष म्हणजे ही बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. तर, गृहमंत्री अमित शाह स्वतः कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोर्ट ब्लेअरला पोहोचले.
ऑनलाइन उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले, ही 21 बेटे आता परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जातील. येणाऱ्या पिढ्या हा दिवस स्वातंत्र्याच्या अमृताचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणून लक्षात ठेवतील. ही बेटे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी चिरंतन प्रेरणास्थान असतील. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.
पंतप्रधान पुढे म्हणाले, अंदमानची ही भूमी ती भूमी आहे, जिथे पहिल्यांदा भारताचा तिरंगा फडकवला गेला. आजही सेल्युलर जेलच्या कोठडीतून अपार वेदनांसोबत अभूतपूर्व शौर्याचे आवाज ऐकू येतात. स्वातंत्र्यानंतर नेताजींना विसरण्याचा खूप प्रयत्न झाला. पण, हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल. विशेष म्हणजे, नेताजींच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी हा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो.
आजचा दिवस महत्त्वाचा - अमित शहादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांवर तिरंगा फडकवला. यावेळी ते म्हणाले, भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज पंतप्रधानांच्या पुढाकाराने, अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठ्या बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत. नेताजींनी आझाद हिंद फौजेच्या प्रयत्नाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या भागाला सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळण्याचा मान मिळाला. आपला तिरंगा पहिल्यांदाच फडकवला गेला.
नेताजींनी 30 डिसेंबर 1943 रोजी येथील जिमखाना मैदानावर राष्ट्रध्वज फडकावला होता आणि आजही त्याच ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ध्वजरोहण झाले आहे. या मैदानाचे नाव आता 'नेताजी स्टेडियम' असे ठेवण्यात आले आहे. आज अमित शहा सेल्युलर तुरुंगालाही भेट देतील, जिथे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यात आले होते.