नवी दिल्ली: देशातील कोणाही अति महत्वाच्या व्यक्तिला (व्हीआयपी) यापुढे ‘नॅशनल सेक्युरिटी गार्ड््स’च्या (एनएसजी) ‘ब्लॅक कॅट कमांडों’ची सुरक्षा न देता ते काम केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यासारख्या निमलष्करी दलांकडे सोपविण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे.
‘व्हीआयपी’ सुरक्षेच्या कामातून सुटका झाली की ‘एनएसजी’च्या सर्व ४५० कमांडोंचा नेमून दिलेल्या मूळ कामासाठी अधिक प्रभावीपणे व तत्परतेने वापर करणे शक्य होईल. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ‘एनएसजी’ कमांडोंनी किती चोख कामगिरी केली हे सर्व देशाने पाहिले होते. हा विचार सन २०१२ पासून सुरु आहे. विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी कर्तव्यांच्या या फेररचनेचे काम नेटाने करण्याचे ठरविले आहे.
मध्यंतरी वरिष्ठ पातळीवर फेरआढावा घेण्यात आला तेव्हा असे ठरले की, जेथे ‘एनएसजी’चा वापर करावा लागेल अशा घटना देशात एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक ठिकाणी घडल्या तरी त्यांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी हे विशेष दल कायम सज्ज असायला हवे. मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी तीन दिवस मिळून एकूण ४०० ‘एनएसजी’ कमांडोंनी आलटून पालटून कर्तव्य बजावले होते.
सध्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मायावती, मुलायम सिंग, चंद्राबाबू नायडूव प्रकाश सिंग बादल या माजी मुख्यमंत्र्यांसह आसामचे मुख्यमंत्री सवार्नंद सोनोवाल व ज्येष्ठ भाजपा नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ठ आडवाणी यांना ‘एनएसजी’ सुरक्षा आहे. याखेरीज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व त्यांच्या पत्नी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांची राहुल आणि प्रियांका ही मुले यांची ‘एनएसजी’ सुरक्षा अलिकडेच काढून घेण्यात आली आहे. ‘सीआरपीएफ’ व ‘सीआयएसएफ’ या निमलष्करी दलांकडे सध्या सुमारे १३० व्यक्तिंच्या सुरक्षेचे काम आहे. त्याच जोडीला ते सध्या ‘एनएसजी’ सुरक्षा असलेल्यांची जबाबदारीही सहजपणे सांभाळू शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.‘एनएसजी’कडून हे काम अपेक्षितच नव्हतेप्रामुख्याने दहशतवादी विरोधीव विमान अपहरण विरोधी अशा जोखमीच्या मोहिमांसाठी लष्करातील निवडक अशा खास प्रशिक्षित अधिकारी व जवानांची ‘एनएसजी’ ही स्वतंत्र तुकडी १९८४मध्ये स्थापन केली गेली तेव्हा त्यांनी ‘व्हीआयपी’ सुरक्षेचे काम करावे, असे बिलकूल अपेक्षित नव्हते. परंतु गेली २० वर्षे ‘एनएसजी’चा या कामासाठी वापर केला जात आहे.