मुझफ्फरनगर : आपल्याला मुल होत नाही, हे दु:ख अनेकांना असते. अनेकदा त्यावर इलाज नसतो. पण त्याला पर्याय मात्र आपणशोधू शकतो. असाच पर्याय येथील कुटुंबाने शोधला त्या दाम्पत्याने १९९0 साली एका अपंग मुलाला दत्तक घेतले आणि आज ते ५१ मुलांचे पालक आहेत. मुल होत नसल्याने सतत तक्रार करणाºयांसमोर या दाम्पत्याने एक उदाहरण ठेवले आहे.शामली येथील कुडाणा गावातील मीना राणा यांचा विवाह १९८१ साली बागपत येथील वीरेंद्र राणा यांच्याशी झाला. लग्नाला १0 वर्षे होत आली, तरी मुल होईना. डॉक्टरांकडे फेºया मारल्या. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर मीना यांना मुल होऊ शकत नाही, असे निष्पन्न झाले. मग त्यांनी ते गावही सोडले. शुक्रतालमध्ये येऊन राहू लागले.तिथे या दाम्पत्याने एक अपंग मुल दत्तक घेतले आणि मांगेराम असे त्याचे नामकरण केले. पण पाच वर्षांनी मांगेराम मरण पावला. पण त्यांनी नशिबापुढे हार मानली नाही आणि पुन्हा मुलाला दत्तक घेण्याचे ठरवले. तिथे त्यांना आठ एकर जमीन मिळाली होती. तिथे त्यांनी अनाथाश्रमच सुरू केला. सोबत एक शाळाही. अनेक मुले तिथे शिकली, त्यांच्यापैकी काहींना चांगल्या नोकºया मिळाल्या. मुल घेताना त्याचा धर्म या दाम्पत्याने कधीच पाहिला नाही.या दोघांनी अनेकांचे विवाहही लावून दिले. हे सारे करताना पैसा लागायचा. पण अनेकांनी त्यांचे काम पाहून देणग्या दिल्या. ही मुले माझी आहेत, असे मीना सांगतात. सध्या त्यांच्याकडे एकूण ४६ मुले असून त्यात १९ मुली आहेत. त्यांच्यापैकी अनेक अपंग आहेत. आता अनाथाश्रममध्ये त्यांनी मुलांना खेळण्यासाठी एक मोठे मैदानही तयार केले आहे. राहण्यासाठी उत्तम खोल्या असून, स्वयंपाकघरही मोठे आहे.... तर भवितव्य काय असते?शुक्रताल ग्रामपंचायतीने जमिनीचा मोठा तुकडा त्यांना दिला. आपले शेजारी आपल्याला धान्य आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवतात, असे विरेंद्र सांगतात. येथे राहणारी २२ वर्षांची वर्षीय ममता आता पोस्ट ग्रॅज्युएशन करीत आहे. मीना व विरेंद्र यांनी सांभाळ केला नसता, तर आम्ही सारे आज कुठे असतो वा आमच्या भवितव्याचे काय झाले असते, याचा विचारही करता येत नाही, असे ममता सांगते.
ते आज आहेत दत्तक घेतलेल्या ५१ मुलांचे पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 3:54 AM