नवी दिल्ली : मुलांना चार घास खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण घेत नाहीत ते असतात आईबाप. पण जे लहानग्या मुलांना वाऱ्यावर सोडून जातात, त्यांना म्हणावे तरी काय? ही कुठलीही काल्पनिक कथा नाही, तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हे भीषण वास्तव आहे. दिल्लीबाहेरील समयपूर बादली या भागात गत आठवड्यात घडलेली ही घटना अंगावर काटा तर उभा करतेच; पण आई-वडिलांच्या ममतेवरही प्रश्नचिन्ह उभे करते. केवळ भुकेपोटी मरणाच्या दारातून परत आलेल्या या दोन मुलींची ही परिस्थिती हृदय हेलावून टाकणारी आहे. अलका (८) आणि ज्योती (३) या मुलींवर सध्या दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचे वडील बबलू हे १५ आॅगस्ट रोजीच घर सोडून निघून गेले. ३५ वर्षीय बबलू यांना दारूचे व्यसन असून, ते बेरोजगार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी आईनेही पाच वर्षाच्या मुलासह घर सोडले. गेल्या आठवड्यात १९ आॅगस्ट रोजी नेपाळी कॉलनीतील रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस तिथे दाखल झाले. एका घराच्या कोंदट खोलीत प्रवेश करताच खाटेवर निपचित पडलेल्या त्या दोन लहान मुली दिसल्या. घरात प्रचंड दुर्गंधी. डासांचा वावर. पोलिसांनी या अर्धमेल्या मुलींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मुलींच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्याचे इन्फेक्शन होत होते. डॉक्टरांनीही चार दिवस प्रयत्नांची शिकस्त करीत या मुलींना अक्षरश: मृत्यूच्या तावडीतून सोडवून आणले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)- पोलिसांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली आहे. या मुली पूर्ण बऱ्या होईपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश बालकल्याण समितीने दिले आहेत. त्यानंतर त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.
आई-वडील गेले मुलींना घरी सोडून
By admin | Published: August 28, 2016 12:29 AM