गुरुग्राम: खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना हरियाणा सरकारकडून देण्यात आलेल्या अर्जामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तुमच्या पालकांना काही आनुवांशिक आजार आहेत का?, तुमचे पालक चुकीच्या मार्गानं पैसा कमावतात का?, अशा प्रश्नांचा समावेश या अर्जात करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी हरियाणा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकारकडून खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज देण्यात आले आहेत. या अर्जाच्या माध्यमातून आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, धर्म, उत्पन्न आणि बँक खात्यांचा तपशील अशी माहिती मागवण्यात आली आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. 'विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरकार त्यांच्या पालकांची अत्यंत खासगी माहिती गोळा करत आहे. हा सर्व प्रकार अतिशय असंवेदनशील आहे. पालकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत चुकीचा आहे का?, असा प्रश्न विचारणं अतिशय धक्कादायक आहे,' असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. हरयाणा सरकारनं मात्र अर्जातून मागवलेल्या माहितीचं समर्थन केलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठीच विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा केली जात असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. हरियाणातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा अर्ज भरुन घेतला जातो, असे राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडूनही हा अर्ज भरुन घेतला जात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात खासगी शाळांनी मात्र हात वर केले आहेत. राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं अर्ज तयार केला असून संपूर्ण माहिती शाळा प्रशासनाला नव्हे, तर सरकारला हवी आहे, असं अनेक शाळांनी पालकांना सांगितलं आहे. अर्जातील काही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्यांची उत्तरं भरु नका, असं अनेक शाळांच्या व्यवस्थापनानं पालकांना सुचवलं आहे. 'तुमचे पालक चुकीच्या मार्गानं पैसे कमवत नाही का?, यासारख्या अनेक प्रश्नांवर पालकांना आक्षेप आहे. त्यामुळे अर्जातील असे प्रश्न तसेच सोडून द्या, असं आम्ही पालकांना सांगितलं आहे,' अशी माहिती दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अदिती मिश्रा यांनी यांनी दिली.
'तुमचे पालक चुकीचं काम करत नाहीत ना?'; सरकारचा विद्यार्थ्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 9:25 AM