मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने केलेलं आक्षेपार्ह ट्विट वादात आल्यानंतर आता अभिनेते व भाजपा खासदार परेश रावल वादात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त ट्विटनंतर परेश रावल यांनी त्या ट्विटला उत्तर देताना तसंच एक वादग्रस्त ट्विटकरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'आमचा चहावाला तुमच्या बार वाल्यापेक्षा कधीही चांगला आहे', असं ट्विट परेश रावल यांनी केलं.
परेश रावल यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर परेश रावल यांच्यावर जोरदार टीका व्हायला सुरूवात झाली. सोशल मीडियावरील टीका वाढत गेल्यावर परेश रावल यांनी ट्विट डिलीट करून माफी मागितली. 'मी केलेलं ट्विट योग्य नव्हतं. म्हणून ते मी डिलीट करतो आहे. लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो', असं म्हणत परेश रावल यांनी पहिलं ट्विट डिलीट केलं.
नेमकं प्रकरण काय ?काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट मंगळवारी (21 नोव्हेंबर) ट्विटरवर शेअर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे या तिघांच्या फोटोवर आधारित एक मीम पोस्ट ट्विटरवर पोस्ट करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहा विकण्यावर खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय युवा काँग्रेसच्या 'युवा देश' या ऑनलाइन नियतकालिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हे अपमानास्पद तसंच वादग्रस्त 'मीम' तयार केलं. दरम्यान, सोशल मीडियातून टीकेचा भडिमार झाल्यानंतर हे वादग्रस्त ट्विट डिलिट करण्यात आलं.
'मीम'मध्ये नेमका काय आहे मजकूर? पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील संभाषणाचे मीम तयार करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'विरोधीपक्ष आपल्यावर कशा पद्धतीचे मेमे बनवतात, असे सांगत आहेत. तर त्याला मेमे नाही तर मीम म्हणतात असे ट्रम्प यांनी मोदीं सांगितले. तर थेरेसा मे मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना 'तुम्ही चहाच विका' असे अपमानास्पद व वादग्रस्त मीम तयार करण्यात आले. काँग्रेसची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागली. त्यानंतर काँग्रेसनं तातडीने हे ट्विट डिलीट केलं.