ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - बॉलिवूडचे अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त टि्वट अखेर डिलीट केलं आहे. काश्मीरमध्ये ज्या अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला, त्या अधिका-याने युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होते असे टि्वट परेश रावल यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नव्या लढाईची सुरुवात झाली होती. परेश रावल हे अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
युवकाला जीपला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अरुंधती रॉय यांनी त्या घटनेवर टीका केल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिल्यानंतर परेश रावल यांनी संबंधित ट्विटकरून रॉय यांच्यावर टीका केली होती. रावल यांच्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्य यानेही रॉय यांच्यावर टीका केली होती. रावल यांच्या एक पाऊल पुढे टाकत भट्टाचार्यने रॉय यांना केवळ जीपला बांधू नका तर गोळ्या घाला असं ट्विट केलं होतं. तसंच भट्टाचार्यने जेएनयूच्या शेहला रशिद हिच्याविरोधातही ट्विट केलं होतं. महिलाविरोधी ट्विट केल्यामुळे त्यांचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे. तर भट्टाचार्यला समर्थन म्हणून गायक सोनू निगमने स्वतःच ट्विटर अकाउंट बंद केलं आहे.
अरुंधती रॉय या लेखिका असण्याबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. काश्मीरमधील मानवी हक्कांबद्दल त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या भूमिकेवर अनेकांना आक्षेप आहे. 1997 साली अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंगस या कादंबरीला बुकर पारितोषिक मिळाले आणि हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले.