पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटूविनेश फोगटने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करून तिने मेडल निश्चित केलं आहे. विनेशने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विनेशला भारताची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू बनण्याची संधी आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापूर्वी विनेश फोगटने भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि लैंगिक छळाच्या विरोधात मोठा लढा दिला होता. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "विनेशच्या विजयावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे मला समजत नाही. पहिल्यांदाच, आपण आनंदी आहोत की रडत आहोत हे मला समजत नाही. संपूर्ण भारतच या मेडलची आतुरतेने वाट पाहत आहे."
"विनेशने इतिहास रचला आहे. विनेश महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.आज सर्व भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. या देशाच्या कन्या आहेत, ज्यांनी नेहमीच देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ज्यांनी या मुलींच्या मार्गात नेहमीच काटे आणले आहेत, त्यांनी निदान या मुलींकडून आता तरी धडा घ्यावा. म्हणजे भविष्यात या मुलींच्या मार्गात काटे पेरण्यापासून परावृत्त होतील" असंही बजरंग पुनिया यांने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना बजरंग पुनिया म्हणाला की, "अभिनंदनासाठी किती वाजता कॉल येईल हे मी आता पाहतोय. विनेश फोगट पुन्हा देशाची कन्या बनली आहे. जंतर-मंतरवर ज्यांच्यासाठी एक शब्दही उच्चारला गेला नाही. ते आता अभिनंदनाचा मेसेज कसा पोहोचवणार. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पूर्ण देश त्या गोष्टीची वाट पाहत आहे."
"चॅम्पियन्सची हीच ओळख, ते मैदानातूनच उत्तर देतात"
विनेश फोगाटने फायनलमध्ये धडक घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "चॅम्पियन्सची हीच ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जगातील तीन सर्वोत्तम कुस्तीपटूंना एकाच दिवसात पराभूत केल्याने आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे."
"ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष खोटा ठरवला आणि त्यांच्या हेतूवर आणि क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले, त्यांना उत्तरं मिळाली आहेत. आज भारताच्या शूर कन्येसमोर तिला रडवणारी संपूर्ण सत्ताव्यवस्था कोसळली आहे. चॅम्पियन्सची हीच ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात. विनेशला खूप खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुझ्या यशाची गर्जना दिल्लीपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत आहे" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.