नाशिक : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी येणार्या भाविकांकडून पार्किंग फी आकारण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली असली तरी हा प्रस्ताव तांत्रिकदृष्टा अडचणीत सापडला आहे. ग्रामपंचायतीने थेट प्रस्ताव पाठविण्याऐवजी गट विकास अधिकार्याच्या अधिकृत पत्रासह फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आल्याने ग्रामपंचयातीचा पार्किंग फी आकारण्याचा प्रस्ताव पंचयात समिती जिल्हा परिषद व पुन्हा पंचायत समितीच्या घेर्यात सापडला आहे. गडावर देवीच्या दर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांवर प्रतिमाणसी २ रु पये टोल आकारणी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला होता. मात्र गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने ग्रामपंचायतीने संबंधित प्रस्तावात सुधारणा करून पार्किंग फी आकारण्याचा प्रस्ताव सादर केला. मध्यंतरीच्या कालावधीत स्थायी समितीने वाहनातून येणार्या प्रतिव्यक्तीप्रमाणे दोन रु पये आकारण्यास मान्यताही दिली होती. या ठरावाच्या आधारे ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या सुधारित प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मोहोरही उमटविली आहे. मात्र, अंतिम मंजुरी देताना ग्रामपंचायत विभागाने थेट प्रस्ताव घेण्यास नकार देत गट विकास अधिकार्यामार्फत अधिकृतपत्रासह फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची आणि गट विकास अधिकार्यांची मान्यता घेतली असताना फेरप्रस्ताव सादर करण्याची गरजच काय? असा सवाल ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेऊन हा तांत्रिक मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला त्यांना यश न आल्याने पुन्हा एकदा गट विकास अधिकार्यांच्या अधिकृत पत्रासह ग्रामपंचायतीला फेरप्रस्ताव मंजूर करून घेतल्यानंतर भाविकांना पार्किंग कर लागू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पार्किंग फी प्रस्ताव तांत्रिक अडचणीत सप्तशृंग गड : फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
By admin | Published: November 08, 2016 12:50 AM