शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ झाला. परिणामी लोकसभेचे कामकाज अनेकदा व नंतर पूर्ण दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. राज्यसभेत सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी मोठ्या चतुराईने कोंडी दूर करण्यासाठी दुपारनंतर कोरोना वर चर्चा करण्यास मंजूरी देत कामकाज चालवले. परंतु, संपूर्ण विरोधी पक्षाने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ न देण्याचा निर्णय घेतला व याला विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दुजोरा दिला. लोकसभेचे कामकाज आता गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. संसद परिसरात तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी प्रदर्शन केले.
सुरजेवाला यांचा आरोप
नरेंद्र मोदी - अमित शहा ही जोड़ी पेगाससच्या मदतीने माजी पंतप्रधान देवेगौड़ा, तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी, उप मुख्यमंत्री परमेश्वर, सिद्धारामैया, डी. के. शिवकुमार यांच्या फोनची टॅपिंग करून काँग्रेस -जेडीएस सरकार पाडण्याच्या प्रयत्नांत होती. मल्लिकार्जुन खरगे, डी. के. शिवकुमार, सिद्धरामैया आणि रणदीप सुरजेवाला यांनी थेट आरोप केला की, याच टॅपिंगच्या आधारे कर्नाटक, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील सरकारे पाडली गेली.