नवी दिल्ली : योगगुरू रामदेव यांचे निकटवर्तीय आणि भाजपाचे कट्टर समर्थक भारतीय पत्रकार वेदप्रताप वैदिक आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांच्या भेटीवरून आज राज्यसभेत गदारोळ झाला. या भेटीशी काही संबंध नसल्याचे सरकारने सांगितले खरे, परंतु काँग्रेस सदस्यांनी भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या भेटीमागील हेतूबद्दल सरकारने सविस्तर निवेदन सादर करण्याची मागणी संसदेच्या दोन्ही सभागृहांत लावून धरली.या पत्रकाराने सईदची भेट घेण्याआधी सरकारची परवानगी घेतली होती काय आणि ही भेट कुणी घडवून आणली, या प्रश्नांचा रेटा लावताना काँग्रेस सदस्य आक्रमक झाल्याने राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास दोनदा तहकूब करावा लागला. हा ‘राष्ट्रीय सुरक्षेबाबतचा गंभीर विषय’ असल्याने परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा गृहमंत्र्यांनी निवेदन केले पाहिजे, या मागणीवर काँग्रेस सदस्य ठाम होते. हा पत्रकार भाजपाशी संबंधित संघटनेचा महत्त्वाचा सदस्य आहे, असा आरोपही त्यांनी केला. जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफीज सईद आणि वैदिक यांच्यात काय चर्चा झाली, वैदिक पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष दूत बनून पाकिस्तान व हाफीज सईदच्या भेटीला गेले होते का, असे सवाल काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी राज्यसभेत उपस्थित केले. सरकारचे म्हणणेभारत आणि भारत सरकारसाठी हाफीज सईद एक दहशतवादी आहे आणि त्याने भारताविरोधात दहशतवादाचे कारस्थान रचले. कोणत्याही पत्रकाराच्या सईद भेटीशी भारत किंवा भारत सरकारला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष किंवा दूरपर्यंत काहीही देणेघणे नाही. सरकारने सईदची भेट घेण्यास कुणालाही परवानगी दिली नाही, असे सरकारची बाजू मांडताना राज्यसभेतील सभागृहाचे नेते आणि अर्थमंत्री म्हणाले.
दहशतवादी सईद-वैदिक भेटीवरून संसदेत गदारोळ
By admin | Published: July 15, 2014 3:26 AM