'देशाच्या अर्थव्यवस्थेला 'डबल A व्हेरिअंट'ची लागण, सगळीकडे अदानी-अंबानी'; राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:42 PM2022-02-02T19:42:05+5:302022-02-02T19:43:17+5:30
Rahul Gandhi In Parliament Budget Session 2022 Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारच्या अर्थनितीवर ताशेरे ओढले आहेत.
Rahul Gandhi In Parliament Budget Session 2022 Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारच्या अर्थनितीवर ताशेरे ओढले आहेत. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे सत्यापासून खूप दूर होतं. गेल्या वर्षभरात ३ कोटीहून अधिक तरुणांना नोकरी गमावली. बेरोजगारीचा साधा उल्लेख देखील त्यांच्या भाषणात नव्हता, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच गेल्या ५० वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यावेळी भारतात असल्याचा दावा देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
यूपीएच्या सरकारनं देशात दरवर्षी २७ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्याचं काम केलं होतं आणि या सरकारनं २३ कोटी जनतेला पुन्हा गरीबीत ढकलण्याचं काम केलं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. "मोदी सरकारनं नोटबंदी आणि जीएसटीनं देशातील असंघटीत क्षेत्र नष्ट करण्याचं काम केलं आहे. यानंतर भारताचे दोन तुकडे झाले. एक श्रीमंताचा भारत आणि दुसरा गरिबांचा भारत", असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधींनी लोकसभेत केला आहे.
"देशातील फॉर्मल सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. दोन सर्वात मोठ्या उद्योगपतींबाबतही मी बोलणार आहे. कोरोनाच्या काळात वेगवेगळे व्हेरिअंट आले. हे दोन देखील वेगळे व्हेरिअंट आहेत की जे देशाच्या अर्थव्यवस्थेत पसरले आहेत. देशातील सर्व एअरपोर्ट्स, बंदरं, पावर, ट्रान्समिशन, खाणकाम, हरित उर्जा, गॅस, खाद्यतेल क्षेत्रात आता अदानी दिसत आहेत. तर अंबानींना टेलिकॉम, पेट्रोकेमिकल्स आणि ई-कॉमर्स क्षेत्रात एकाधिकारीशाही निर्माण करू दिली आहे. त्यामळे सारी संपत्ती या दोघांकडेच जात आहे. सर्व ठिकाणी अदानी आणि अंबानीच आहेत.", असं राहुल गांधी म्हणाले.