नवी दिल्ली - लोकसभेला महाराष्ट्रात इंडिया आघाडीला चांगले यश मिळते मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होतो. या निवडणुकीत हिमाचल प्रदेशची जितकी लोकसंख्या आहे तितक्या नव्या मतदारांची नोंदणी मतदार यादीत केली जाते. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या काळात ७० लाख नवीन मतदार समाविष्ट करण्यात आले असं सांगत काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपासह निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे केलेत. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेत ते बोलत होते.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके ५ वर्षात मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या ५ महिन्यात जोडले गेले. शिर्डीच्या एका इमारतीत ७ हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसते. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येइतके मतदार नव्याने सामाविष्ट होतात. आम्ही निवडणूक आयोगाकडे लोकसभा मतदार यादी, नाव आणि पत्ते मागितले. नवे मतदार बहुतांश अशा मतदारसंघात वाढलेत जिथे भाजपा साफ झाली होती. हा डेटा आमच्याकडे आहे. निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या कमिटीने करायची होती. सरन्यायाधीशांना कमिटीतून का हटवण्यात आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तर चीन उत्पादनात आपल्या पुढे आहे. आपल्याशिवाय अमेरिकेत उत्पादन शक्य नाही. भारतीय बॅकिंग सिस्टम बदलण्याची गरज आहे. ओबीसींची संख्या देशात ५० टक्क्याहून कमी नाही. तेलंगणात ९० टक्के एससी एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक आहेत. भाजपाचे ओबीसी खासदार तोंड उघडत नाहीत. भाजपाच्या ओबीसी, एससी, एसटी खासदारांकडे अधिकार नाहीत. जर इंडिया आघाडीचं सरकार असते तर राष्ट्रपतींचे अभिभाषण कसे असते याचा विचार करत होतो. पंतप्रधानांनी मेक इन इंडिया म्हटलं, जे चांगले आहे परंतु उत्पादन क्षमता अयशस्वी झाली. आयडिया चांगले पण ते फेल होतात असा टोला राहुल गांधींनी लगावला.
दरम्यान, आज लोक AI बद्दल बोलत आहेत. एआय डेटावर कार्य करते. डेटाशिवाय काहीही नाही. मग एआय कोणता डेटा वापरत आहे? हा प्रश्न आहे भारताकडे कोणतीही आकडेवारी नाही. एकतर AI चीनी किंवा अमेरिकन डेटा वापरेल. मी या देशातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशात क्रांती येणार आहे. आपण पेट्रोलवरुन इलेक्ट्रिक मोटरवर स्विच करत आहोत. युद्ध, वैद्यकीय उपचार, शिक्षण, सर्वकाही बदलत आहे. कोणताही देश उपभोग आणि उत्पादन या दोन गोष्टींवर चालतो. १९९० पासून सर्व सरकारांनी उपभोगावर चांगले काम केले आहे. रिलायन्स, अदानी, टाटा, महिंद्रा या सर्वांचा झपाट्याने विकास झाला, पण एकूणच देशाचा विकास झाला नाही असा आरोप राहुल गांधींनी केला.