Smriti Irani Attacks Rahul Gandhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लंडनमधील भाषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजप नेते सातत्याने राहुल गांधींवर टीका करत असून, त्यांच्या माफीची मागणी करत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू आणि गिरिराज सिंह यांच्यानंतर आता स्मृती इराणी (Smriti Irani) यांनीही राहुल गांधीच्या माफीची मागणी केली आहे.
'राहुल गांधींनी परकीय शक्तींकडे मदत मागितली'स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावरुन टीका केली. 'ज्या देशाने भारताला गुलाम बनवले होते, त्याच देशात जाऊन राहुल गांधी परकीय शक्तींकडे मदत मागत आहेत. भारतातील लोकशाही व्यवस्था मोडीत काढताना राहुल गांधी इतर देश भारतातील परिस्थितीत हस्तक्षेप का करत नाहीत, अशी खंत व्यक्त करत आहेत,' अशी टीका इराणी यांनी केली.
'तेव्हा विद्यापीठात का गेला होता?'त्या पुढे म्हणतात की, 'मला राहुल गांधींना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही परदेशात जाऊन म्हणालात की, मला देशातील कोणत्याही विद्यापीठात बोलण्याचा अधिकार नाही. तसे असेल तर मग 2016 मध्ये दिल्लीतील एका विद्यापीठात 'भारत तेरे टुकडे होंगे'चा नारा लागला तेव्हा ते तिथे का गेला होतात. तिथे जाऊन तुम्ही कोणाचे समर्थन केले होते?' असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
'राहुल गांधींनी संसदेची माफी मागावी''राहुल गांधी यांनी देशाच्या संसदेची माफी मागावी. परदेशात जाऊन देशाचा व संस्थांचा अवमान करण्याचे काम त्यांनी केले आहे. मोदीविरोधी बनता बनता राहुल देशविरोधी झाले आणि लंडनमध्ये बसून लोकशाहीचा अपमान केला. भारताला गुलाम बनवण्याचा इतिहास असलेल्या देशात जाऊन राहुल गांधींनी मदत मागितली,' अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली.