Congress Vs BJP: लंडनमधील वक्तव्यामुळे भाजप राहुल गांधींच्या माफीवर ठाम आहे. यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजावर मोठा परिणाम पडत आहे. या गोंधळादरम्यान काँग्रेसने केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. 'काँग्रेसने जेपीसीची मागणी सोडली तर भाजप राहुल गांधींच्या माफीची मागणी करणार नाही', अशी ऑफर केंद्राने दिलाचा खुलासा काँग्रेसने केला आहे.
या बाबात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "पंतप्रधानांच्या अदानी घोटाळ्यात जेपीसीची विरोधकांची मागणी भाजपच्या निराधार आरोपांवर आधारित राहुल गांधींच्या माफीशी कशी जोडली जाऊ शकते?"
रमेश पुढे म्हणतात, "जेपीसीची मागणी तथ्ये आणि कागदपत्रांच्या आधारे उघडकीस आलेल्या घोटाळ्यासाठी आहे. अदानी प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप राहुल गांधींच्या माफीची मागणी करत आहे,' असे रमेश म्हणाले. याशिवाय, जेपीसीची मागणी वगळण्याचा आणि राहुल गांधींनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काँग्रेसकडून म्हटले जात आहे.
अदानी प्रकरणावर जेपीसीची मागणी काँग्रेस अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याची मागणी करत आहे, तर भाजप काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या माफीवर ठाम आहे. काँग्रेस आणि भाजपमधील या राजकीय भांडणामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा विस्कळीत होत आहे. दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू झाला, मात्र गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सुरू होऊ शकले नाही. हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार असून त्यापूर्वी 23 मार्च रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प मंजूर होणार आहे. आता तो चर्चेविना मंजूर होईल, असे मानले जात आहे