New Parliament Building nauguration: देशातील नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे रविवारी (२८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या भव्यदिव्य सोहळ्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व 775 खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी सेंगोल (राजदंड) सभागृहात बसवला. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले होते.
जवळपास 971 कोटी रुपये खर्चून बांधलेले नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. दरम्यान, संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन देशात राजकारण सुरू आहे. काँग्रेस, TMC, AAP, NCP, DMK यांसह २१ पक्षांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे, तर NDA आणि NDA त नसलेल्या 28 पक्षांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. उद्घाटनानंतर समर्थक आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
पीएम मोदी काय म्हणाले? उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, आजचा दिवस आपल्या सर्व देशवासियांसाठी अविस्मरणीय आहे. संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणारी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ही भव्यदिव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणाबरोबरच देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्याला नवीन गती आणि शक्ती देईल.'
ओम बिर्ला म्हणाले...लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण हा आपल्या लोकशाही इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. लोकशाहीचे हे नवे मंदिर एकता, अखंडता, समता, न्याय आणि बंधुत्वाची भावना दृढ करून देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले, ऐतिहासिक क्षण! 'न्यू इंडिया'च्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचे प्रतीक असलेले भव्य, वैभवशाली आणि प्रेरणादायी नवीन संसद भवन आज आदरणीय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले आहे. सर्व देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन!
राहुल गांधींचा टोलानवीन संसदेच्या उद्घाटनानंतर राहुल गांधींनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले की, संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत.
आप नेत्याची जहरी टीका
आप आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्र्याने म्हटले की, एका सम्राटाने मुमताजला ताजमहालमध्ये पुरले होते आणि संपूर्ण जग ते पाहण्यासाठी येते. आज एका सम्राटाने संविधानाला पुरले, ते पाहण्यासाठी लोक नक्कीच येतील.
जेडीयूने संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन देशासाठी कलंक असल्याचे म्हटले आहे. JDU MLC नीरज कुमार म्हणाले, नवीन संसदेचे उद्घाटन म्हणजे हुकूमशाही आणि मोदींचा इतिहास देशात लागू केला जात आहे. नव्या संसदेच्या माध्यमातून देशाला कलंक लावण्याचा इतिहास लिहिला जात आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या..राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधकांच्या उपस्थितीशिवाय संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पूर्ण होऊ शकत नाही. हा एक अपूर्ण कार्यक्रम आहे, याचा अर्थ देशात लोकशाही नाही. विरोधी पक्षातील नेत्यांशी ते फोनवर संपर्क साधू शकत होते. जुन्या संसद भवनाशी आमच्या आठवणी जोडलेल्या आहेत. जुने संसद भवन, हाच भारताच्या स्वातंत्र्याचा खरा इतिहास आहे.
आरजेडीची वादग्रस्त टीकाराष्ट्रीय जनता दलाने नवीन संसद भवनाबाबत एक वादग्रस्त ट्विट केले असून त्यात त्याची तुलना शवपेटीशी करण्यात आली आहे. आरजेडीने एक चित्र ट्विट केले आहे, ज्यामध्ये एका बाजूला नवीन संसद भवन आहे, तर दुसऱ्या बाजूला शवपेटीचे चित्र आहे.