नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावरुन परतताच रविवारी रात्री अचानक सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकाम स्थळाचा अचानक दौरा केला. पंतप्रधानांनी उपस्थित इंजिनियर्सकडून नवे संसद भवन आणि इतर कामांचा आढावा घेतला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे ८.४५ च्या सुमारास सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकाम स्थळी पोहोचले. त्यांच्या येण्याची माहिती आधी कुणालाही नव्हती. आता, मोदींच्या या भेटीचं एकीकडे कौतुक होत असतानाच खासदार असुदुद्दीन औवेसींनी साईटवरील भेटीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामाचे अचानक निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षेच्या सर्व मापदंडांचे पालन केले. त्यांनी डोक्यावर हेल्मेटही परिधान केले होते. सध्या सोशल मीडियावर मोदींच्या या साईट भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरुन, अनेकांनी त्यांना ट्रोलही केलंय. तर, आता खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी, संसद हे पंतप्रधान कार्यालयाचे डोमेन नाही. लोकसभा अध्यक्षांशिवाय हे येथे आलेच कसे? लोकसभा अध्यक्षांनी मोदींना परवानगी दिली होती का? असा प्रश्न औवेसी यांनी विचारला आहे. तसेच, संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांच्या तत्वांचे हे उल्लंघन आहे, असेही औवेसी यांनी म्हटले आहे.
९१७ कोटी रुपयांचे नवे संसद भवन
राजधानी दिल्लीमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाची निर्मिती होत आहे. नव्या संसद भवनाचे बांधकाम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणावर काम सुरू आहे. नवे संसद भवन हे जुन्या संसद भवनापेक्षा १७ हजार चौरस मीटरने मोठे असेल. हे संसद भवन ९७१ कोटी रुपये खर्चून सुमारे ६४ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये बांधून तयार होईल. यामध्ये एक मोठा संविधान हॉल, खासदारांसाठी एक लाऊन्ज, एक वाचनालय, विविध समित्यांसाठी खोल्या, डायनिंग एरियासारखे विभाग असतील. नव्या संसद भवनाच्या चेंबरमध्ये ८८८ खासदारांच्या बसण्याची व्यवस्था असेल. तर राज्यसभेमध्ये ३८४ जणांच्या बसण्याची व्यवस्था असेल.