चीनमध्ये कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. देशात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पंतप्रधान मोदींपासून, आरोग्य मंत्री, निती आयोग, आरोग्य सचिव आदींनी कोरोनाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. असे असताना आज अचानक लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज हे २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते. म्हणजे आजचा दिवस पकडून पाच दिवस कामकाज चालणार होते. परंतू, पाच दिवस आधीच कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात येणार आहे. आज संसदेचे कामकाज संपणार आहे.
हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरला सुरुवात झाली होती. आजच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत ३४ गैर सरकारी सदस्यांच्या विधेयकांवर विचार केला जाणार आहे. तसेच लोकसभेत देखील काही विधेयकांवर कार्यवाही केली जाणार आहे.
पीआरएस लेजिस्लेटिव रिसर्चनुसार बुधवारपर्यंत लोकसभेची उत्पादकता १०३ टक्के आणि राज्यसभेची उत्पादकता १०० टक्के होती. या काळात एकूण ६२ तास आणि ४२ मिनिटे १३ बैठका झाल्या.
कोरोनावर पंतप्रधान म्हणाले...कमजोर आणि वृद्धांसाठी बूस्टर डोसला प्रोत्साहन द्यावे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा. सणासुदीच्या काळात गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. राज्यांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित सुविधा द्याव्या. कोरोना महामारी अजून संपलेली नाही. विमानतळांवर देखरेख ठेवण्याच्या उपाययोजना मजबूत करा. राज्यांनीही ऑक्सिजन पुरवठा व इतर बाबतीत सज्ज राहावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.