Lok Sabha Security Breach Incident: १३ डिसेंबर रोजी संसद हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली, त्याच दिवशी लोकसभेत गोंधळ पाहायला मिळाला. कामकाज सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली आणि बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. अन्य दोघांनी संसद परिसरात निदर्शने करत घोषणाबाजी केली. या चारही जणांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींना आता १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड असलेला ललित झा फरार होता. मात्र, दिल्ली पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केल्याचे सांगितले जात आहे.
सागर आणि मनरंजन डी हे दोन आरोपी लोकसभेत घुसले होते. तर, दोन आरोपी नीलम आणि अमोल शिंदे बाहेर आंदोलन करत होते. तेव्हा ललित झा संसदेबाहेर उपस्थित होता. आरोपी नीलम आणि अमोल यांनी संसदेबाहेर केलेल्या निदर्शनाचा आणि घोषणाबाजीचा व्हिडिओ ललित झा याने बनवला. त्याच्याकडेच सर्व आरोपींचे फोन होते. ललितने हा व्हिडिओ त्यांच्या एनजीओ पार्टनरला व्हॉट्सअॅप केला होता. संसद परिसरात गोंधळ सुरू झाल्यानंतर ललित तेथून पसार झाला.
मास्टरमाइंड ललित पोलिसांना शरण
मिळालेल्या माहितीनुसार, ललित झा याने दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. कर्तव्य पथ येथील पोलीस स्थानकांत ललित झा स्वतः पोलिसांना शरण गेला. यानंतर पोलिसांनी ललित झा याला स्पेशल सेलकडे सोपवण्यात आले. ललित झा याचा जवळचा सहकारी नीलाक्ष याने दिलेल्या माहितीनुसार, ललित पश्चिम बंगालचा विद्यार्थी आहे. ललित सामाजिक कार्यात सक्रीय आहे. ललित हा कम्युनिस्ट सुभाष सभा नावाच्या एनजीओचा सरचिटणीस होता. हा एनजीओ ग्रुप नीलाक्ष याचा आहे.
दरम्यान, संसदेची सुरक्षा भेदल्यानंतर ललितने नीलाक्षला फोन केला होता. ललितने दुपारी एक वाजता संसदेबाहेर झालेल्या निदर्शनाचा व्हिडिओही पाठवला होता. मीडिया कव्हरेज पाहा. हा व्हिडिओ सुरक्षित ठेवा. जय हिंद, असे ललितने यासोबत लिहिलेल्या मेसेजमध्ये सांगितले, अशी माहिती नीलाक्षने दिली.