Parliament Mansoon Session : विरोधकांनी संसदेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसचा इतिहासच बाहेर काढला. विरोधकांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाल्याची टीका केंद्र सरकारवर केली होती. प्रत्युत्तरात मोदींनी काँग्रेसवरच भारताचे तुकडे केल्याचा आरोप केला.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक मणिपूर मुद्द्यावर पीएम मोदींनी बोलण्याची मागणी करत आहेत. यावेळी मोदींनी मणिपूरवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपण सगळे सोबत मिळून मणिपूरचा प्रश्न मार्गी लावू. काही लोक भारत मातेच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करतात. मणिपूरमध्ये भारत मातेचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य करतात.
विरोधक भारत मातेच्या मृत्यूबाबत भाष्य करतात, उलट त्यांनीच भारताचे तीन तुकडे गेले आहेत. काँग्रेसचा इतिहासच तोडण्याचा राहिला आहे. काँग्रेसच्या काळात मिझोरमवर वायुसेनेद्वारे हल्ले करण्यात आले होते. त्यांच्याच काळात अमृतसरमध्ये अकाल तख्तवर हल्ला झाला होता. या सगळ्या घटना इंदिरा गांधींच्या काळात झाल्या होत्या. काँग्रेसने नॉर्थइस्टचाही विश्वास तोडला आहे.
मोदी पुढे म्हणाले, अमित शहांनी कालच सभागृहात मणिपूरवर सविस्तर माहिती दिली आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करण्यासही तयार होते, पण विरोधक चर्चेपासून दूर पळत होते. ईशान्येतील सर्व समस्यांचे मूळ काँग्रेस राजवट आहे. माजी पंतप्रधान नेहरूंनी ईशान्येकडील राज्यांमध्ये विकास होणार नाही, याची काळजी घेतली. ईशान्य हा आपल्यासाठी अतिशय जवळ आहे. मणिपूरसाठी विरोधकांची वेदना आणि सहानुभूती निवडक आहे. लवकरच मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल. देश मणिपूरच्या लोकांच्या, महिलांच्या पाठीशी आहे. लवकरच न्यायालयाचा निर्णय येईल आणि महिलांविरोधात गंभीर गुन्हे घडवणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
संबंधित बातमी- 'अनेक वर्षांपासून एकच फेल प्रोडक्ट लॉन्च करत आहेत', PM मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
संबंधित बातमी- फिल्डिंग तुम्ही लावली अन् चौकार-षटकार इथून लागले; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल