नवी दिल्ली - एअर स्ट्राईचा हिरो आणि भारताच्या हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची मिशी राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची मागणी चक्क संसदेत करण्यात आली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी लोकसभा सत्रात बोलताना, अभिनंदन यांना त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. तसेच त्यांच्या मिशीला राष्ट्रीय मिशी घोषित करावी, अशी मागणीही चौधरी यांनी केली.
अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. तसेच, विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्य पुरस्काराची मागणी करत त्यांची मिशी राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची मागणी केली. चौधरी यांच्या या मागणीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विंग कमांडर अभिनंदन यांनी एअर स्ट्राईकवेळी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. या हल्ल्यावेळी ते पाकिस्तान लष्कराच्या तावडीत सापडले. मात्र, तिथेही त्यांनी हिंमतीने उत्तरे देत भारताची शान वाढवली. त्यानंतर, भारत सरकारने अभिनंदन यांना पाकिस्तानच्या तावडीतून परत आणावे, यासाठी देशभरातून सरकारवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे, सरकारनेही पाकिस्तानवर दबाव टाकून अभिनंदन यांची सुटका केली. अभिनंदन यांची सुटका होताच, देशभरात या भारतमातेच्या पुत्राची वाहवा आणि शौर्याचे कौतुक करण्यात आले. तर, अभिनंदन यांच्या मिशीप्रमाणे कित्येक तरुणांनी स्वत:ची मिशी बनवून त्यांच्या शौर्याचे गोडवे गायले. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेतही रोहित शर्माच्या शतकानंतर अभिनंदन यांच्या मिशीप्रमाणे रोहितचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अभिनंदन यांच्या शौर्याची कथाही शाळेतील पुस्तकात छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अभिनंदन यांची देशभरात प्रचंड क्रेझ असून हीच क्रेझ आज संसदेत पाहायला मिळाली. संसदेत काँग्रेस नेत्यांनी अभिनंदन यांच्या मिशीला राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची मागणी केली. अमिताभ बच्चन यांच्या शराबी चित्रपटातील मुँछे हो तो नथ्थुराम जैसी हो... वरना ना हो... हा डॉयलॉग प्रंचड गाजला होता. त्यानंतर, मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो... वरना ना हो... हा डॉयलॉग उद्यास आला आहे.