Parliament Mansoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 'तुम्हाला फक्त सत्तेची चिंता आहे, पण देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर वारंवार विश्वास दाखवला आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली.
सत्तेसाठी एकत्र आलातपीएम मोदी यावेळी म्हणाले, 'आज सर्व विरोधक एकत्र आले आहेत. त्यांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, सत्तेची भूक डोक्यात आहे. देशातील युवकांच्या भविष्याची पर्वा नाही, स्वतःच्या राजकीय भविष्याची चिंता आहे. या अधिवेशनात ते एक्तर आले फक्त अविश्वास प्रस्तावासाठी, पण यातही कशाची चर्चा केली. थोडी तयारी करुन यायला हवं होतं.'
चौके-छक्के आम्ही लगावले....'तुम्ही तयारी करुन का येत नाही? फिल्डिंग तुम्ही लावली होती, पण चौके-छक्के आम्ही लगावले. मी 2018 मध्येच सांगितलं होतं की, पुढच्यावेळी तयारी करुन या. तुम्ही काहीच तयारी करुन आला नाहीत. तुमची काय अवस्था झाली, देश तुम्हाला पाहतोय. तुमच्या एक-एक शब्दाला देश ऐकतोय. तुम्ही प्रत्येकवेळी देशाची निराशाच केली आहे. ज्यांचे स्वतःचे 'वहीखाते' बिघडलेले आहेत, ते आम्हाला आमचा हिशोब मागत आहेत,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.
अधीर रंजन चौधरींवर टीकामोदी पुढे म्हणाले, 'या अविश्वास प्रस्तावात काही विचित्र गोष्टी पाहण्यात आल्या. सर्वात मोठ्या विरोधी नेत्यांचे बोलणाऱ्यांच्या यादीत नाव नव्हते. मागचे उदाहरण पाहा, 1999 अटलजींच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता, तेव्हा शरद पवारांनी विरोधकांचे नेतृत्व केले होते. 2003 मध्येही अटलजींचे सरकार होते, तेव्हा सोनिया गांधी यांनी नेतृत्व केले होते. 2018 मध्ये खर्गे यांनी नेतृत्व केले, पण यंदा अधीर रंजन यांची काय अवस्था झाली. त्यांच्याच पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. आज त्यांना परत एकदा बोलण्याची संधी दिली होती, पण त्यांनी 'गुड का गोबर' केला, यात ते माहीर आहेत,' अशी खोचक टीकाही मोदींनी यावेळी केली.